Anti-Conversion Bill : धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी.! मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
सक्तीच्या धर्मांतराविरोधात कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Anti-Conversion Bill – Nitesh Rane : सक्तीच्या धर्मांतराविरोधात कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून कायद्यात रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
या विधेयकानुसार कोणत्याही व्यक्तीचे जबरदस्तीने, फसवणुकीने किंवा प्रलोभन देऊन धर्मांतर केल्यास संबंधित व्यक्तीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच अटकही केली जाऊ शकते.
मंत्री नितेश राणे म्हणाले, सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधात अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत होते. त्या मागण्या लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही हिंदू भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही.
धर्मांतर किंवा लव्ह जिहादसारखे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत. ज्या कार्यकर्त्यांनी यासाठी मोर्चे काढले, संघर्ष केला आणि काहींनी प्राणांचे बलिदान दिले, त्या सर्वांच्या संघर्षाचा आज खऱ्या अर्थाने विजय झाला आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्रातील प्रस्तावित धर्मांतरविरोधी कायदा मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यांतील कायद्यांपेक्षा अधिक कठोर असेल, असा त्यांनी दावा केला. या कायद्याच्या सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कायद्यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मांडण्यात येईल. त्यानंतर विधानसभेत मांडले जाईल. त्यानंतर विधानपरिषदेत हे विधेयक आणले जाईल. विधानपरिषदेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर याबाबत कायदा आणला जाईल.
या कायद्याच्या तांत्रिक तरतुदी आणि अंमलबजावणीची प्रक्रिया याबाबत मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री लवकरच सविस्तर माहिती देणार आहेत, असेही राणे यांनी सांगितले.





