जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; एक दहशतवादी ठार

Doda Terrorist Attack | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला आहे. डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या टेम्पररी ऑपरेटिंग बेस (TOB) वर मंगळवारी हा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात एक नागरिक जखमी झाला आहे. तर भारतीय लष्कराकडून एका दहशतवादाचा खात्मा करण्यात आला आहे. रियासी आणि कठुआनंतर जम्मू भागात गेल्या तीन दिवसांत झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे.
या हल्ल्याबाबत जम्मूचे एडीजीपी आनंद जैन म्हणाले, “गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला आणि एक नागरिक जखमी झाला, त्याच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. ऑपरेशन अजूनही सुरू असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत.” दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका घरावर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेल्याच्या काही तासांनंतर डोडा जिल्ह्यात हा दहशतवादी हल्ला झाला.
मंगळवारी रात्रीपासून जम्मू विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये दोन चकमक सुरू आहे. जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील हिरानगर येथील सावल भागात मंगळवारी रात्री चकमक झाली, जिथे सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. या गोळीबारात सीआरपीएफचा एक जवानही जखमी झाला आहे. जम्मूच्या डोडा जिल्ह्यातील छत्रकला भागात दुसरी चकमक सुरू आहे. छत्रकला भागात जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या तात्पुरत्या तळावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.
#Army and #Police joint Naka has engaged #terrorist in area of Chattargala area of #Doda . Firefight is going on.
More details to follow— ADGP Jammu (@adgp_igp) June 11, 2024
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी या हल्ल्याबाबत X वर पोस्ट केले आणि लिहिले, “आंतरराष्ट्रीय सीमेजवळील हिरानगर सेक्टरमधील सैदा गावात घरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मी कठुआचे डीसी राकेश मिन्हास यांच्याशी सतत ऑनलाइन संपर्कात आहे. मी घटनास्थळी असलेले एसएसपी कठुआ अनायत अली चौधरी यांच्या संपर्कात आहे. ज्या घरावर हल्ला झाला त्या घराच्या मालकाशीही फोनवर संपर्क झाला आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू आहे. आतापर्यंत एक दहशतवादी मारला गेला आहे. मी आणि माझे कार्यालय सतत संपर्कात असून घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत’, अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला केला होता, त्यानंतर ही बस दरीत कोसळली. या दहशतवादी हल्ल्यात नऊ प्रवासी ठार झाले, तर 30 हून अधिक जण जखमी झाले.
हेही वाचा:
“राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा” ; काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, दिले निवेदन





