पुणे | पीएमपीची आणखी एक पर्यंटन बससेवा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पीएमपीकडून जिल्ह्यातील पर्यटन स्थळांंसाठी मागील वर्षापासून विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत वेगवेगळ्या पर्यटन स्थळांसाठी सात मार्गांवर सेवा सुरू असून ५ आॅगस्टपासून पीएमपीकडून नऱ्हे, आंबेगावमधील शिवसृष्टी व स्वामी नारायण मंदिर ही दोन स्थळे असलेली बससेवा सुरू केली जाणार आहे.
पर्य़टकांकडून मागणी होत असल्याने तसेच व परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढीचे दृष्टीने ही सेवा सुरू केली जाणार असून या नवीन पर्यटन बससेवेच्या मार्गामध्ये खालीलप्रमाणे ऐतिहासिक, धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.
पुणे स्टेशन येथून सकाळी साडे आठ वाजता आणि डेक्कन जिमखाना येथून सकाळी ९.४५ वाजता या बस असणार असून त्यात, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, इस्काॅन मंदीर, शिवसृष्टी, तसेच स्वामी नारायण मंदीराचा समावेश असणार असून पुणे स्टेशन येथे सायंकाळी ६ वाजता तर डेक्कन येथे ६.३० पर्यंत बस परत येतील.
प्रवेश शुल्क भरावे लागणार…
पीएमपीच्या या बससेवेत प्रवाशांना प्रवासासाठीचे ५०० रूपयांचे शुल्क असणार आहे. तर राजीव गांधी प्राणी संग्रहालय तसेच शिवसृष्टी येथे प्रवेशशुल्क प्रवाशांनाच भरावे लागणार आहे. या प्रवेश शुल्काचा बस सेवेच्या तिकिटात समावेश असणार नाही.





