लखनौ –उत्तरप्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने (सुभासप) शुक्रवारी राष्ट्रपती निवडणुकीतील एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. तसा निर्णय घेणारा सुभासप हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएबाहेरील आणखी एक पक्ष ठरला आहे. सुभासपच्या पाऊलामुळे समाजवादी पक्षाच्या (सप) नेतृत्वाखालील उत्तरप्रदेशातील विरोधकांच्या आघाडीला तडे गेल्याचेही स्पष्ट झाले आहे.
उत्तरप्रदेशात काही महिन्यांपूर्वी झालेली विधानसभा निवडणूक सुभासपने सपच्या नेतृत्वाखालील आघाडीचा घटक बनून लढवली. त्या निवडणुकीत बाजी मारून भाजपने उत्तरप्रदेशची सत्ता राखली. पराभवानंतर विरोधकांच्या आघाडीत आणि विशेषत: सप, सुभासपमध्ये धुसफूस सुरू झाल्याचे अनेकदा दिसून आले.
आता राष्ट्रपती निवडणुकीसाठी वेगवेगळ्या दिशांना तोंड केल्याने दोन्ही पक्षांमधील संबंध आणखीच ताणले गेल्याचे सूचित होत आहे. सपने विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. सुभासपने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्याने तो पक्ष भाजपच्या जवळ जाऊ लागल्याचे मानले जात आहे. सुभासपचे उत्तरप्रदेशात 6 आमदार आहेत.