दहशतवादी हल्ल्यात आणखी एक जवान शहीद

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील गुलमर्ग भागात गुरुवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आणखी एक जवान शहीद झाला आहे. नागीन भागात एलओसीजवळ दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता.
यामध्ये गुरुवारीच २ सैनिक आणि २ कुली शहीद झाले. जखमी जवानाला श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र शुक्रवारी सकाळी त्याचाही मृत्यू झाला. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात ५० हून अधिक दहशतवादी सामील होते. उत्तर काश्मीरमधील बोटा पाथरी सेक्टरमध्ये एलओसीवरून दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असावी, असा अंदाज आहे.
रायफलमॅन कैसर अहमद शाह आणि रायफलमॅन जीवन सिंह अशी गुरुवारी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. आज शहीद झालेल्या तिसऱ्या सैनिकाबाबतचा तपशील समोर आलेला नाही. या परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. शुक्रवारी सकाळीही शोधमोहीम सुरूच होती.





