पुणे | मनोरमा खेडकर यांचा आणखी एक कारनामा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आएएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मेट्रो अधिकारी, पोलिसांशी अरेरावी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन वर्षांपूर्वी मनोरमा यांनी मेट्रो अधिकारी आणि पोलिसांशी बाणेर येथील बंगल्यसमोर वाद घातला होता. या बाबतची चित्रफीत व्हायरल झाली आहे.
मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तूलाचा धाक दाखविल्याप्रकरणी मनोरमा खेडकर, त्यांचे पती दिलीप यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खेडकर यांचा बाणेरमधील नॅशनल सोसायटीत ओमदीप बंगला आहे. बंगल्यासमोर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू होते.
मेट्रोने पदपथावर साहित्य ठेवले होते. या कारणावरुन खेडकर यांनी मेट्रोच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकारी चतु:शृंगी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह तेथे पोहोचले. तेव्हा खेडकर यांनी मेट्रोचे अधिकारी आणि पोलिसांशी वाद घालून अरेरावी केली.
त्यावेळी या घटनेचे चित्रीकरण एका पोलीस कर्मचाऱ्याने केले होते. मेट्रो अधिकारी, पोलिसांशी अरेरावी करतानाचे चित्रीकरण संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून ठेवले होते, अशी माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली. या प्रकरणात खेडकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता, असे पोलिसांनी सांगितले




