बॉलीवूडची आणखी एक अभिनेत्री करतेय कर्करोगाचा सामना

Tannishtha Chatterjee | अभिनेत्री आणि दिग्दर्शिका तनिष्ठा चॅटर्जीच्या वडिलांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले. या दु:खातून सावरत असतानाच तिला कर्करोगाचं निदान झाले आहे. एका मुलाखतीदरम्यान तनिष्ठाने तिच्या स्तनाच्या कर्करोगाबद्दलची माहिती दिली.
तनिष्ठाला चार महिन्यांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं असून ती म्हणाली की, ‘गेल्या वर्षी मी माझ्या वडिलांनाही कॅन्सरमुळे गमावलं. जेव्हा मला माझ्या आजाराबद्दल कळलं तेव्हा मी या धक्क्यातून सावरत होते. माझ्या आयुष्यात सर्व काही उध्वस्त असलं तरी मी तुटलेली नाही. मी यातून माणुसकी शिकली आहे. लोकांना तुमची काळजी आहे. हे पहिल्यांदाच आहे की, मला स्ट्रॉन्ग राहण्याचा कंटाळा आला आहे.”
“माझी ७० वर्षांची आई आणि ९ वर्षांची मुलगी आहे ज्यांची मला काळजी घ्यायची आहे. मला त्यांच्यासाठी खंबीर राहावं लागलं. ज्या दिवशी मला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरबद्दल कळलं, तेव्हा मी विचार केला की माझ्यासोबत असं का झालं? माझे काय कर्म आहेत? मी खूप हताश झाले होते.” Tannishtha Chatterjee |
तनिष्ठा पुढे म्हणाली की, “माझ्या मुलीला बहिणीसोबत अमेरिकेत पाठवलं आहे. मुलीला माझ्यापासून दूर जायचं नव्हतं पण मला तिचं बालपण खराब करायचं नाही. तिला इथे एकटं वाटावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. माझ्याशिवाय तिच्यावर प्रेम करणारे लोक आहेत याची जाणीव तिला व्हावी, अशी माझी इच्छा आहे. अध्यात्म आणि योग मला आजाराचा सामना करण्यास मदत करत आहेत. माझा आजार आता हळूहळू बरा होत आहे,” असा विश्वासही तिने व्यक्त केला.
तानिष्ठाने आतापर्यंत ‘पार्च्ड’, ‘मान्सून शूटआऊट’, ‘गुलाब गँग’, ‘सनराईज’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. Tannishtha Chatterjee |





