श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी भाजपच्या एका नेत्याची गोळ्या घालून हत्या केली. त्यामुळे तेथील दहशतवादी हल्ल्यांत 2 वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची संख्या 23 वर पोहचली आहे.
दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भाजप नेते जावेद अहमद डार यांच्यावर गोळीबार केला. घराजवळच झालेल्या त्या हल्ल्यात डार यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्या हल्ल्याचा सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
जम्मू-काश्मीरात मागील काही काळापासून दहशतवादी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना निशाणा बनवत आहेत. एकट्या कुलगाम जिल्ह्यात वर्षभरात त्या पक्षाचे 9 नेते आणि कार्यकर्ते दहशतवादी हल्ल्यांत मृत्युमुखी पडले आहेत. त्या हल्लासत्रामुळे भाजप नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.