करोनाग्रस्तांच्या संख्येमुळे चिंतेत वाढ
पुणे – शहरात सलग दुसऱ्या दिवशीही 1,705 करोनाबाधित सापडले. त्यातील रॅपिड ऍन्टिजेन्स टेस्टमधील 850 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे बाधितांची एकूण संख्या 34 हजार 40 वर पोहोचली आहे. दिवसभरात 11 बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद असून, मृतांची संख्या 917 इतकी झाली आहे.
शहरात शुक्रवारी दिवसभरात 2,800 जणांची रॅपिड ऍन्टिजेन्स टेस्ट आणि 4 हजार 11 संशयितांची स्वॅब असे एकूण 6 हजार 811 जणांची तपासणी करण्यात आली.
सध्या विविध रुग्णालयांत 12 हजार 16 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 527 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 82 जणांना व्हेंटिलेटर लावला आहे. तर 445 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दिवसभरात 773 बाधित घरी सोडले असून, आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या 21 हजार 107 झाली आहे. तर 20 हजार 330 व्यक्तींना क्वारंटाइन केले आहे.