Kangana Ranaut : नवनिर्वाचित खासदार कंगनाची खिल्ली उडवणं अन्नू कपूर यांना पडलं महागात; जाहीरपणे मागितली माफी

मुंबई : अभिनेता अन्नू कपूर सध्या ‘हमारे बारह’ या चित्रपटमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने मागच्या अनेक दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी होती, त्यानंतर ती उठवण्यात आली आणि आता चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर अन्नू कपूर यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्यामध्ये त्यांनी बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतची खिल्ली उडवली होती. यानंतर अन्नू कपूर यांच्या या भाष्यावर कंगनाने प्रतिक्रिया दिली होती . पण त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर आता अन्नू कपूर यांनी अभिनेत्रीची जाहीरपणे माफी मागितली.
काय लिहिले पोस्टमध्ये?
अन्नू कपूर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘मी कोणतंही टीव्ही, न्यूज चॅनेल, ओटीटी आणि वर्तमानपत्रे वाचत नाहीत. कोणत्याही देशाची व्यवस्था किंवा कायदे आणि नियम माहीत असून चूक करणं हा गुन्हा ठरू शकतो, पण विशिष्ट व्यक्ती किंवा ठिकाण माहीत नसणं हा गुन्हा नाही. मी कंगनाला ओळखत नाही. एका स्त्रीचा अनादर करण्याचा माझा हेतु नव्हता.’ तसेच त्यांनी अभिनेत्रीला सल्ला देताना म्हंटले कि ‘जेव्हा मीडिया प्रश्न विचारेल तेव्हा समजून घ्या की त्यांना मसाला हवा आहे, जो माझ्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना मिळाला. माझा धर्म आणि राजकारणाशी काही संबंध नाही. धर्माचा संबंध नाही, त्यामुळे अधर्माचाही संबंध नाही. माझ्या बोलण्याने तू नाराज झाली असशील तर मला माफ कर.’ असं म्हणत अभिनेत्यानं कंगनाची माफी मागितली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
अन्नू कपूरने ‘हमारा बारह’च्या प्रमोशनदरम्यान कंगना रणौतबद्दल बरंच काही म्हटलं आहे. त्यांनी कंगनासोबत घडलेल्या थप्पड कांडाविषयी भाष्य करत म्हटलंय की, ‘कोण आहे ही कंगना, ती सुंदर आहे का?’ मोठी अभिनेत्री आहे का?’ अभिनेत्यानं कंगनाला ओळखण्यास नकार देताच उपस्थित एकानं ‘ती नुकतीच खासदार झाली आहे’ असं म्हटलं. हे ऐकून, ‘अरे ती पण आता खासदार झाली का?’ असं अन्नू कपूर यांनी म्हटलं होतं.
कंगनाने दिले होते प्रत्युत्तर?
अन्नू कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत कंगनाने ‘तुम्ही अन्नू कपूर यांच्याशी सहमत आहात का? आपला समाज यशस्वी स्त्रीचा तिरस्कार करतो. जर ती सुंदर असेल तर तो द्वेष जास्त वाढतो आणि त्याही पुढे जाऊन ती शक्तिशाली असेल तर तिला अधिक हिणवलं जातं.’ असं म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं.





