संतापजनक! मदतीसाठी गेलेल्या WHO च्या कर्मचाऱ्यांकडून महिलांवर अत्याचार; तपासातून धक्कादायक माहिती उघड

न्यूयॉर्क : जगात जेंव्हा जेंव्हा महामारी येते किंवा कोणताही संसर्गजन्य आजार उदभवतो त्यावेळी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ही संघटना मदतीसाठी जगात काम करते. सध्या सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. यासाठी देखील WHOकडून मोठी मदत होताना दिसत आहे. मात्र WHOच्या कर्मचाऱ्यांबाबत एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
WHO च्या तब्बल 21 कर्मचाऱ्यांनी कांगोमध्ये अल्पवयीन मुली आणि महिलांवर बलात्कार केल्याची, त्यांचे लैंगिक शोषण केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एका तपासा दरम्यान ही खळबळजनक माहिती पुढे आली आहे. एका हिंदी संकेतस्थळाने याबाबतची माहिती दिली आहे. आफ्रिकी देशांमध्ये 2018 ते 2020 दरम्यान या संतापजनक घटना घडल्या आहे.
WHO चे कर्मचारी इबोला महामारीसोबत लढण्यासाठी या ठिकाणी गेले असताना हा प्रकार घडला आहे. तपासामध्ये भयावह वास्तव समोर आल्यानंतर WHO प्रमुख टेड्रोस एडनम घेब्रेयेसस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच गुन्हा केलेल्या कर्मचाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा मिळायला हवी असे देखील म्हटले आहे.
रिपोर्टनुसार, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलांचं देखील लैंगिक शोषण करण्यात आले आहे. जवळपास 83 लोकांनी या दरम्यान महिलांवर अत्याचार केले. यात जागतिक आरोग्य संघटनेच्या तब्बल 21 कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता.
पीडित महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांना ड्रिंकमधून नशा आणणारे पदार्थ दिले जात होते. तर काही महिलांना नोकरीचे आश्वासन देऊन त्याचे लैंगिक शोषण करण्यात आले. तसेच आरोपी यानंतर अबॉर्शन करण्यासाठी दबाव टाकायचे.
कांगोमध्ये इबोला महामारीने जवळपास दोन हजार लोकांचा मृत्यू झाला. हा रिपोर्ट प्रकाशित झाल्यानंतर टेड्रोस एडनम घेब्रेयेसस यांनी WHO च्या वतीने कामावर ठेवण्यात आलेल्या लोकांनी लोकांची सेवा करणं अपेक्षित होतं. पण त्यांनी असे काम केले याचे दु:ख होत आहे असे म्हटले आहे.





