मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी गोड करण्यात येणार आहे. कारण राज्यातील जनतेला सरकारकडून केवळ १०० रुपयात रवा, डाळ, साखर आणि तेल मिळणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तब्बल एक कोटी 62 लाख 42 हजार शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार आहे. त्यांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याशिवाय पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्यात येणार आहेत तर नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.