Kranti Redkar : ‘काकण’नंतर नव्या चित्रपटाची घोषणा! Friendship Day च्या दिवशी पहिलं पोस्टर समोर
Kranti Redkar : समर टाईम्स प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केले आहे.

Kranti Redkar : आयुष्यातील काही नाती बदलतात, काही दूर जातात, पण मैत्रीचं नातं यापलीकडचं असतं. अनेक मैत्रीचे किस्से आपण ऐकलेले असतात किंवा मग पाहिलेले असतात. मैत्रीच्या दिवशी म्हणजेच फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे हिने सोशल मीडियावरुन एक खास गिफ्ट चाहत्यांना दिलं आहे.
मैत्रीच्या शब्दांपलीकडच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘मैत्रेया’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. समर टाईम्स प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केले आहे.
‘काकण’सारख्या संवेदनशील चित्रपटानंतर त्या पुन्हा एकदा वेगळ्या आणि भावनिक विषयासह प्रेक्षकांसमोर येत आहेत. चित्रपटाची निर्मिती मनोज खळतकर यांनी केली आहे. चित्रपटाच्या पोस्टरमधून समर, आयुषी, स्काय आणि रुची या चार प्रमुख पात्रांची ओळख करून देण्यात आली आहे.
या चार जणांच्या आयुष्याभोवती कथा फिरणार असल्याचे संकेत पोस्टरमधून मिळतात. मात्र, त्यांच्या नात्याचे नेमके स्वरूप काय आहे आणि कथेत कोणते भावनिक पैलू उलगडणार आहेत, याबाबत अद्याप गुप्तता राखण्यात आली आहे.
View this post on Instagram
चित्रपटाविषयी बोलताना क्रांती रेडकर वानखेडे म्हणाल्या, “‘मैत्रेया’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अशा मैत्रीची गोष्ट आहे, जी काळ बदलला तरी मनाच्या एका खास कोपऱ्यात कायम राहते. या चित्रपटात मैत्रीचे विविध रंग, नात्यांमधील गुंतागुंत आणि आयुष्याची अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना अनुभवायला मिळतील. ‘काकण’नंतर आणखी एक वेगळी आणि भावनिक कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना खूप आनंद होत आहे. हा प्रवास लवकरच सर्वांसोबत शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
‘मैत्रेया’च्या घोषणेनंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, या चित्रपटाशी संबंधित अधिक माहिती समोर येण्याची चाहत्यांना प्रतीक्षा लागली आहे.
Karishma Tanna : बाळाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच करिश्मा कॅमेऱ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल





