Moshi building collapse: मोशी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना ४० लाखांच्या मदतीची घोषणा
महापौर रवि लांडगे यांनी दिली माहिती

पिंपरी – मोशी कचरा डेपो दुर्घटनाग्रस्त मृतांच्या नातेवाइकांना ४० लाख रुपये मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर रवि लांडगे यांनी शनिवारी (दि.११) दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून १० लाख , अँथनी लारा कंपनीकडून २५ लाख आणि राज्य सरकारकडून ५ लाख रुपये अशी ही मदत केली जाणार आहे.
मोशी येथील कचरा डेपोमध्ये घडलेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौ-यावर असताना शुक्रवारी (दि.१०) उशिरा बैठक घेतली. या बैठकीला महापौर लांडगे यांच्यासह आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
या बैठकीची माहिती देताना महापौर लांडगे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा सविस्तर आढावा घेत पीडित असलेल्या मृतांच्या नातेवाइकांना सर्वतोपरी मदत करण्याची सूचना दिल्या आहेत.
मृतांच्या नातेवाइकांना महापालिकेकडून १० लाख रुपये, अँथनी लारा कंपनीकडून २५ लाख रुपये आणि राज्य सरकारकडून ५ लाख रुपये अशी एकूण ४० लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले. तर, अँथनी लारा कंपनीच्या अधिका-यांनीही यावेळी आर्थिक मदत व मृतांच्या नातेवाईकांना नोकरी देण्याचे जाहीर केले आहे.





