थेऊर (प्रतिनिधी) – हवेली तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीपैकी 45 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची माळ महिलांच्या गळ्यात पडणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गाबरोबर सर्वसाधारण प्रवर्गातही महिला आणि पुरुष दोघांनाही संधी असल्यामुळे हवेलीमध्ये “कारभारणी’चा राज चालणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
हवेली तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुनील कोळी, महसूल नायब तहसीलदार संजय भोसले यांचे उपस्थितीत पंचायत समिती हवेली कार्यालयात विवीध गावांतील नागरिकांच्या समोर शुक्रवारी (दि. 29) घेण्यात आली. याप्रसंगी बहुतांशी गावातील पॅनेल प्रमुख आपल्या कार्यकर्त्यांसमवेत उपस्थित होते. यावेळी आरक्षणाची कार्यपद्धती, लोकसंख्या निकष आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांवर तहसीलदार कोळी यांनी विस्तृतपणे माहिती दिली.
सरपंचपदासाठी खुलेआम चालणारा घोडेबाजार आणी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे सरपंचपदासाठी यापूर्वी झालेल्या आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्या होत्या. सरपंचपदाच्या आरक्षणानंतर संबंधित जातीच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणे, जातीचा दाखला अमान्य होणे तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणे इत्यादी कारणांमुळे निवडणूक रद्द करुन पुनश्च नव्याने निवडणूक घेणे क्रमप्राप्त ठरते. या पार्श्वभूमीवर या बाबींचा सारासार विचार करून सरपंच आरक्षण सोडतीबाबत एकसमान धोरण शासनाने राबविले.
सर्वाधिक चुरशीच्या व लोकसंख्येने मोठ्या असलेल्या लोणी काळभोर आणि उरुळी कांचन या ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहिल्याने याठिकाणी सरपंच कोणाच्या गटाचा होणार याकडे पूर्व हवेलीचे लक्ष लागले आहे. सरपंचपदाचे आरक्षण आज जाहीर झाल्यामुळे यापुढील काळात मात्र सरपंच पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकारण तापणार आहे.
प्रवर्गानुसार आरक्षण :-
सर्वसाधारण : लोणी काळभोर, उरुळी कांचन, मनेरवाडी, रहाटवडे, शिवापूर, वडगाव शिंदे, आंबी, भवरापूर, जांभळी, केसनंद, कोरेगाव मूळ, मांजरी खुर्द, मांडवी बु, नायगाव, पेठ, प्रयागधाम, शिंदेवाडी, सांगवी सांडस, तरडे, वढू खु, वळती, फुलगाव, वाघोली, नांदेड.
सर्वसाधारण (महिला) : सोरतापवाडी, शिंदवने, शेवाळेवाडी, वडाची वाडी, पिसोळी, कल्याण, मांगडेवाडी, गोगलवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, बिवरी, भावडी, गोऱ्हे बुद्रुक, कोंढणपूर, पिंपरी सांडस, आहिरे, खामगाव मावळ, वाडे-बोल्हाई, किरकटवाडी ,कोंढवे धावडे, न्यू कोपरे ,खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, आर्वी, गाउडदरा, खेड शिवापूर, श्रीरामनगर, हिंगणगाव, खडकवाडी, न्हावी सांडस, थेऊर, कदमवाकवस्ती, कोलवडी साष्ट.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : मालखेड, आष्टापूर, बहुली, गोऱ्हे खुर्द, शिरसवाडी, सोनापूर, बुर्केगाव, पेरणे, नांदोशी, डोणजे, निरगुडी, लोणीकंद.
अनुसुचित जाती प्रवर्ग (महिला) : खानापूर, मांडवी खुर्द, आगळंबे, डोंगरगांव, तुळापूर, कुडजे व बकोरी.
अनुसुचित जाती : वडकी, कुंजीरवाडी, वरदाडे, आव्हाळवाडी, आळंदी म्हातोबाची, जांभूळवाडी, कोळेवाडी व सांगरूण.
अनुसुचित जमाती (महिला) : खामगांव टेक.
अनुसुचित जमाती : घेरासिंहगड.