“अंनिस’ची “चला व्यसन बदनाम करुया’ मोहीम

सातारा – गेल्या काही वर्षांमध्ये 31 डिसेंबरला सेलिब्रेशनच्या नावाखाली खास करून तरुणपिढीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. अनेक तरुण-तरुणी 31 डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जावून व्यसनाच्या आहारी जातात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस आणि परिवर्तन व्यसनुमक्ती संस्थेतर्फे “चला व्यसन बदनाम करूया’ ही व्यसन विरोधी मोहीम चालवली जाणार असल्याची माहिती डॉ. हमीद दाभोलकर, उदय चव्हाण आणि प्रशांत पोतदार यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगिकले की, सध्या समाजात व्यसनाचे उद्दात्तीकरण होत असल्याने तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळेच व्यसनाची प्रतिष्ठा तोडण्याबरोबरच शासनाने समग्र व्यसन विरोधी नीती जाहीर करावी यासाठी देखील पाठपुरावा केला जाणार आहे. लान्सेट या जगप्रसिद्ध शास्त्रीय नियतकालिकात छापून आलेल्या शोध निबंधाच्या प्रमाणे दारूचे व्यसन हे कितीही सौम्य प्रमाणात असले तरी ते हानी कारक असते ह्या शोध निबंधातील माहिती समाजापर्यंत पोहचवण्याचा आणि त्या विषयी प्रबोधन करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे.
या मोहिमे अंतर्गत तरुणांना व्यसनमुक्तीदूत म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. व्यसनमुक्ती दूताचे प्रशिक्षण घेतलेले युवक युवती समाजात व्यसनविरोधी पोस्टर प्रदर्शन, व्यसनविरोधी फिल्म शाळा कॉलेजमध्ये दाखवणे, गावामध्ये व्यसनविरोधी फेरीचे आयोजन करणे, शाळा कॉलेजमध्ये व्यसनाविषयी प्रबोधन करणे, दारूच्या बाटलीला जोडे मारा आंदोलन, व्यसनविरोधी प्रतिज्ञा असलेल्या फ्लेक्सवर नागरिकांच्या सह्या घेणे तसेच सोशल मिडिया मध्ये व्यसनविरोधी संदेश प्रसारित करणे, असे कार्यक्रम राबवणार आहोत. 31 डिसेंबरला लोकांनी दारू प्यावी म्हणून दारू दुकाने उशिरापर्यंत चालू ठेवण्याची परवानगी शासन देते, हे व्यसनाला बढावा देणारे धोरण शासनाने थांबवावे म्हणून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे.
आज “दारू नको दूध प्या’ उपक्रम
31 डिसेंबरला “दारू नको दुध प्या’ या अभिनव कार्यक्रर्माचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये नागरिकांना दारुचे दुष्परिणाम सांगून दारुऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना दुधाचे मोफत वाटप देखील करण्यात येणार आहे. 31 डिसेंबर रोजी परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेत व्यसनमुक्त व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्नेहमेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. पुसेगाव, साताऱ्यात गोल बाग राजवाडा येथे मोफत दुध वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. किशोर काळोखे, वंदना माने, दीपक माने, भगवान रणदिवे, हौसेराव धुमाळ, शंकर कणसे हे या यशस्विते साठी प्रयत्न करीत आहेत.





