विशेष : डॉ. बजरंग कोरडे ग्रामीण भागातील जमीनदार, सावकार आणि पारंपरिक व्यापारी यांचा अण्णा भाऊ साठेंना संताप होता, कारण बरेचदा हेच लोक सामान्य माणसाची पिळवणूक करीत म्हणून “खापऱ्या चोर'(1946) या लोकनाट्यात अण्णा भाऊंनी या पिळवणूक करणाऱ्यांना आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले. “बेकायदेशीर’ (1947) हे लोकनाट्य 1947च्या निवडणुकांच्या राजकारणावर प्रकाश टाकते. “माझी मुंबई’ (1948) हे लोकनाट्य भाषावार प्रांतरचनेच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेले आहे. यात मुंबई ही महाराष्ट्राची आहे, हे ठामपणे त्यांनी सांगितले. यातील “काळ्या बाजाराचा पोवाडा’ हा पोवडा सध्यस्थितीला लागू पडणारा आहे. “लोकमंत्र्याचा दौरा’ (1952) हे लोकनाट्य 1952 साली महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडींवर लिहिले आहे. प्रख्यात मराठी लेखक पु. ल. देशपांडे यांनी “पुढारी पाहिजे’ हे नाटक लिहिले. पु. लं. च्या या नाटकाला उत्तर म्हणून अण्णा भाऊंनी “पुढारी मिळाला’ हे नाटक लिहिले. 1948 साली अण्णा भाऊंनी आपल्या लेखन-कारकिर्दीतील पूर्ण लांबीचे असे एकमेव नाटक लिहिले. ते म्हणजे “इनामदार’. हे नाटक त्यांच्याच “वैर’ या कादंबरीवर आधारित आहे. अण्णा भाऊंच्या लोकनाट्याचे विषय आणि संरचना पाहता असे दिसते की, पारंपरिक वगनाट्ये आणि अण्णा भाऊंची लोकनाट्ये यांच्यामध्ये विषय व संरचना यांच्याबाबतीत बराच फरक आहे. शैली, संरचना आणि विषयाचे प्रस्तुतीकरण यांच्या बाबतीत अण्णा भाऊंनी आपल्या लोकनाट्यांमध्ये पारंपरिक तमाशापेक्षा मूलतः वेगळेपण जपले व जोपासले. त्यांनी भौतिक तसेच सामान्य लोकांसमोरील चालू व ज्वलंत समस्यांवर लोकनाट्ये लिहिली. त्यांनी लिहिलेल्या एकूण पंधरा लोकनाट्यांपैकी एकही लोकनाट्य ऐतिहासिक, पौराणिक किंवा धार्मिक विषयावर आधारलेले नाही. महिलांनाही स्वाभिमान असतो व तो आपण जपायला हवा, त्याप्रमाणे वर्तनही करायला हवे, या ठाम भूमिकेतूनच त्यांनी लोकनाट्यांमधून महिलांची थट्टामस्करी करणे पूर्णतः थांबवले. सामान्य लोकांची पिळवणूक आणि अशा पिळवणुकीविरुद्ध लोकांची आंदोलने व त्यामुळे लोकांमध्ये जाणीव निर्माण होणे हे त्यांच्या लोकनाट्यांचे काही प्रमुख विषय होते. अण्णा भाऊंच्या वैचारिक बांधीलकीचा विचार करता, ते कम्युनिझम या क्रांतिकारी तत्त्वज्ञानाचे पाईक होते. त्यांच्या पद्यरचनासुद्धा या प्रकारच्याच होत्या. सर्व कम्युनिस्टांप्रमाणे अण्णा भाऊंच्या मतेसुद्धा माणसांचे फक्त दोनच प्रमुख वर्ग आहेत. एक म्हणजे श्रीमंतांचा/पिळवणूक करणाऱ्यांचा वर्ग तर दुसरा, गरीब/पिळवणूक होणाऱ्यांचा वर्ग. या दोन वर्गांमध्ये कधीतरी संघर्ष होईल आणि त्या संघर्षात गरिबांचा विजय होईल, असेही त्यांना वाटत असे. अण्णा भाऊंनी एकूण पंधरा पोवाडे लिहिले, असे म्हटले जाते. परंतु आज त्यापैकी फक्त नऊ पोवाडे उपलब्ध आहेत. या पोवाड्यांतून त्यांनी जगाच्या, भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासाच्या, लोकजीवनाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण बदल घडवणाऱ्या घटना व व्यक्ती यांचा उहापोह केलेला आहे. “स्टालिनग्राडचा पोवाडा’ (1942), “बर्लिनचा पोवाडा’ (1946), “अमळनेरचे अमर हुतात्मे’ (1947) “महाराष्ट्राची परंपरा’ ही त्यातील काही महत्त्वपूर्ण उदाहरणे. अण्णा भाऊंनी सुमारे तीस कादंबऱ्या लिहिल्या. “फकिरा'(1959) ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी. अण्णा भाऊंच्या साहित्यातील बऱ्याचशा व्यक्तिरेखा घाम गाळून आपली चटणी-भाकरी मिळवतात. त्यामुळे त्यांना संर्घषाची भीती वाटत नाही. त्यामुळेच बरेच जण कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संघर्ष करीत असतात. (समाप्त)