चंदिगढ : पंजाबमधील सत्तारूढ आपच्या आमदार अनमोल गगन मान यांनी शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिला. मात्र, पक्षाने मनधरणी केल्यानंतर त्या रविवारी राजीनामा मागे घेण्यास राजी झाल्या. पंजाबी गायिका असणाऱ्या मान वर्ष २०२० मध्ये आपच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाल्या. त्या २०२२ यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन प्रथमच आमदार बनल्या. त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेशही करण्यात आला. मात्र, सप्टेंबर २०२४ मध्ये मंत्रिमंडळात फेरबदल करताना ४ मंत्र्यांना वगळण्यात आले. त्यामध्ये समावेश असल्याने मान यांचेही मंत्रिपद गेले. त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती. अशात ३५ वर्षीय मान यांनी अचानकपणे आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. राजकारणही सोडत असल्याचे त्यांनी नमूद केले. तो निर्णय आप आणि त्या पक्षाच्या नेत्यांना चकित करणारा ठरला. त्यानंतर आपचे प्रदेशाध्यक्ष अमन अरोरा यांनी रविवारी मान यांची भेट घेतली. अरोरा यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली. मान यांचा राजीनामा स्वीकारण्यास आप उत्सुक नाही. त्यांनी यापुढेही कार्यरत राहावे, असा पक्षाचा संदेश त्यांच्या पर्यंत पोहचवण्यात आला. मान राजीनामा मागे घेण्यास तयार झाल्याने आपला दिलासा मिळाला.