Air India : एअर इंडिया अपघातानंतर ‘अंकिता वालावलकर’ची पोस्ट चर्चेत; यूरोप दौऱ्याचा अनुभव सांगितला…

Ankita Walawalkar | Air India : लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला गुरूवारी दुपारी अहमदाबादमध्ये भीषण अपघात झाला. एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यावर काही क्षणात विमान खाली आलं आणि नागरी वस्तीतल्या मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं.
यामध्ये विमानातील प्रवासी आणि वसतीगृहातील विद्यार्थी अशा एकूण 265 जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देशासह जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताबद्दल सर्वांनीच दु:ख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजी वाहिली.
एअर इंडियाचं विमान कोसळणं ही या देशातील हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आहे. अत्यंत सुरक्षित समजलं जाणारं ड्रीमलाइनर हे टेक ऑफ नंतर एका मिनिटाच्या आत कोसळतं आणि त्यातील एक प्रवासी वगळता 241 प्रवासी मृत्यू पावतात.
दरम्यान, अशातच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर हिची एक पोस्ट चर्चेत आली आहे. अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर अंकिताने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. काही दिवसांपूर्वीच ती आपल्या नवऱ्यासह युरोप फिरायला गेली होती त्यावेळी तिने एअर इंडियाच्याच विमानातून प्रवास केलेला.
या नऊ तासांच्या प्रवासात दरम्यान अंकिता वालावलकरला जो काही वाईट अनुभव आला तो तिने शेअर केला आहे. अंकिताने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की काही दिवसांपूर्वीच मी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास केला.
‘तिथे एसी व्यवस्थित काम करत नव्हता, याशिवाय टीव्ही स्क्रीनची अवस्था सुद्धा अतिशय वाईट होती आणि जेवणाबद्दल तर मला काही बोलायचंच नाही आहे… नऊ तासांचा विमान प्रवास आम्ही अशा परिस्थितीत पार केला आहे.
विमानांची अशाप्रकारे वाईट देखभाल करून ते लोकांचे जीव धोक्यात का घालत आहेत?’ असं अंकिता म्हणाली आहे. सध्या तिची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
अहमदाबाद येथील झालेल्या या दुर्घटनेमध्ये मृता पावलेल्या प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी आता त्यांच्या कुटुंबाची डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांचे मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात येतील. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुद्धा प्रवास करत होते.







