Ankit Baliyan Murder : धक्कादायक ! हरियाणवी गायक अंकित बालियानची हत्या
उत्तर प्रदेशातील शामली येथे एका जिमबाहेर चार हल्लेखोरांनी लोकप्रिय हरियाणवी गायक आणि युट्युबर अंकित बालियानची (Ankit Baliyan Murder) गोळ्या झाडून हत्या केली.

Ankit Baliyan Murder : उत्तर प्रदेशातील शामली येथे एका जिमबाहेर चार हल्लेखोरांनी लोकप्रिय हरियाणवी गायक आणि युट्युबर अंकित बालियानची (Ankit Baliyan Murder) गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी गायकावर सुमारे २० राउंड गोळीबार केला. त्यामध्ये डोक्यावर लागलेल्या गोळीचाही समावेश होता. हा गायक मरेपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार सुरूच ठेवला होता.
भरी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान या गाजलेल्या गाण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या ३५ वर्षीय गायकावर तो संध्याकाळी ७ च्या सुमारास जिममधून बाहेर पडत असताना गोळीबार करण्यात आला. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बालियानच्या (Ankit Baliyan Murder) हत्येची जबाबदारी गोगी गँगने स्वीकारली आहे. गँगचा दावा आहे की, हा गायक त्यांच्या शत्रूंच्या संपर्कात होता आणि त्याने गँगशी संबंधित एका घटनेवर गाणे तयार केले होते.
गँगशी संबंधित असल्याचे मानल्या जाणाऱ्या भोलू शाहपुरियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ही तर फक्त सुरुवात आहे, प्रत्येकाची वेळ येईल. या गँगने उत्तर प्रदेश पोलिसांनाही धमकावले असून, बालियानच्या हत्येसारख्या आणखी घटना घडवण्याचा इशारा दिला आहे. गोळीबारात तीन ते चार अज्ञात व्यक्तींचा सहभाग होता, असेही पोलिसांनी सांगितले.
या हत्येनंतर बलियानचे (Ankit Baliyan Murder) कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी निषेध नोंदवला. मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी करत त्यांनी त्याचा मृतदेह रस्त्यावर ठेवून दिल्ली-मुझफ्फरनगर रस्ता रोखून धरला. आरोपींना पकडेपर्यंत आपण तिथून हलणार नाही आणि अटकेनंतरच अंत्यसंस्कार केले जातील, असे आंदोलकांनी सांगितले.






