पुणे | प्राण्याची शिकार करणारे; चार जण वनविभागाच्या ताब्यात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वन्य प्राण्याची शिकार करणाऱ्या चार जणांना वनविभागाने ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे मळवंडी थुले येथे ही घटना घडली.
दिनेश ज्ञानेश्वर थूले (रा. मळवंडी ठुले, ता. मावळ), गंगाराम धोंडीबा आखाडे (ता. मावळ, रा. मळवंडी ठुले), सुनील ठोकू कोकरे (रा. मळवंडी ता. मावळ), सुमित तुकाराम गुरव (रा. वाळीन, ता. मुळशी) अशी आरोपींची नावे आहेत.
बुधवारी (दि. १९) रोजी गुप्त माहितीच्या आधारे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव,
वनपरिमंडळ अधिकारी दय डोमे, वनरक्षक आशा मुंढे, वनरक्षक साईनाथ खटके, आदींच्या पथकाने मौजे मळवंडी थुले येथे धाड टाकली. या मध्ये भेकर प्रजातींच्या वन्य प्राण्याचे शिजवलेले मांस, मानवी बनावटीच्या दोन बंदुका, कोयता, भाला, काडतूस, छर्रा, गॅस सिलेंडर, शेगडी आदी ताब्यात घेतले.





