विरार : वसई -विरारमधील मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. बुधवारी अटक करण्यात आलेले वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार, निलंबित नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी तसेच बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता आणि त्यांचा मुलगा अरुण गुप्ता यांना 20 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने हा निर्णय दिला आहे. अनिलकुमार पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर त्यांना ईडीने कार्यालयातूनच अटक केली. अटकेनंतर चौघांनाही मुंबईतील जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना गुरूवारी सकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दरम्यान, अनिलकुमार पवार यांच्यावर अनधिकृत बांधकाम प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. २९ जुलै २०२५ रोजी ईडीने पवार यांच्याशी संबंधित वसई, मुंबई, पुणे, नाशिक आणि सटाणा येथे एकाच वेळी छापेमारी केली होती. या छाप्यात पवार यांच्या वसईतील शासकीय निवासस्थानासह एकूण १२ ठिकाणांचा समावेश होता. या कारवाईत पवार यांच्या शासकीय निवासस्थानातून १ कोटी ३३ लाख रुपये रोख, कागदपत्रे, हार्डडिस्क, नातेवाईक व बेनामी व्यक्तींच्या नावावरील प्रॉपर्टीची कागदपत्रे, कॅश-चेक स्लिप्स आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली होती.