‘अनिल परब मातोश्रीचे वसुली मंत्री आहेत’

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. एकीकडे उच्च न्यायालयाने संप थांबविण्याचा आदेश दिलेला आहे, तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.
हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे,यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजप नेत्यांनी पाठिंबा दिला दिला असून यावरून राज्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. मात्र अद्याप विलीनीकरणाच्या मागणीवर शासनाने तोडगा काढला नाही. यावर आता भाजप नेते शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायक मेटे यांनीही महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. आंदोलनाच्या मुद्द्यावरून मंत्री अनिल परब यांच्यावर त्यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले विनायक मेटे
‘परिवहन आणि विधिमंडळ अशी दोन्ही खाती अनिल परब यांचाकडे आहेत. परब मातोश्रीचे वसुली मंत्री आहेत. ज्यांच्या जीवावर तुम्ही मंत्रिपद भोगत आहात, त्यांची विचारपूसही तुम्ही करत नाही. तुम्ही आई-वडिलांनाच विसरून जात आहात. अनिलजी, तुम्ही इथे आलात तर कुणी मारणार नाही. तसेही तुम्ही पोलिसांना हँडल केले आहे, असा टोला मेटे यांनी परब यांना लगावला आहे




