Anil Kumar Pawar : वसई विरार शहर महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांची ईडीकडून 18 तास चौकशी

ED Raid on former VVCMC Commissioner Anil Kumar Pawar । वसई विरार शहर महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार (Anil Kumar Pawar) यांची अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) तब्बल 18 तास चौकशी केली आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता सुरू झालेली कारवाई रात्री दीड वाजेपर्यंत सुरू होती. या दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी कोणालाही ताब्यात घेतले नसले तरी, निवासस्थानातून अनेक महत्वाची कागदपत्रे, हार्ड डिस्कमधील मोठ्या प्रमाणातील डिजिटल डाटा हस्तगत केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वसईच्या दीनदयाल येथील पालिकेच्या शासकीय निवासस्थानी मंगळवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. मात्र माजी आयुक्त अनिलकुमार पवार (Anil Kumar Pawar) यांनी दरवाजा उघडण्यास विलंब केल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना तब्बल 1तास 15 मिनिटे बाहेर वाट बघावी लागली, त्यानंतर त्यांनी नाईलाजास्तव टाळे खोलण्यासाठी दुसरी चावी बनवणाऱ्या कारागिराला बोलवावे लागले त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी शासकीय गृहात प्रवेश केला.
कारवाई सुरू असताना माजी आयुक्त अनिलकुमार पवार (Anil Kumar Pawar) यांच्या पत्नीला देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानातून दुपारी दोनच्या सुमारास गाडीतून बाहेर नेले होते. त्यानंतर त्यांना रात्री 9च्या सुमारास शासकीय निवासस्थानी परत आणण्यात आले होते. त्यानंतर या कारवाईचा वेग वाढला होता. वसई विरार शहर महानगर पालिकेच्या माजी आयुक्तांची मंगळवारी सकाळी सुरू झालेली चौकशी अखेर बुधवारी दुसऱ्या दिवशी रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी पूर्ण झाली त्यानंतर रात्री दोन वाजता ईडीचे अधिकारी निवासस्थानातून बाहेर पडले होते.
या कारवाईमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या कारवाईत नेमकं काय हाती लागलं, याविषयी अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. चौकशीतून नेमकं काय समोर आलं आणि या प्रकरणात कोणते धागेदोरे सापडले, हे सर्व तपशील ईडीकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत.





