अनिल कपूरचा नायक चित्रपट सत्यात; ‘ही’ युवती होणार राज्याची एक दिवसाची मुख्यमंत्री

नवी दिल्ली : अभिनेता अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेला आणि राजकीय पार्श्वभूमीवर आधारित नायक हा हिंदी चित्रपट काही वर्षांपूर्वी चांगलाच गाजला होता. आदर्श मुख्यमंत्री कसा असावा यावर आधारित हा चित्रपट होता. वृत्तवाहिणीचा कॅमेरामॅन, मुलाखतकार आणि एक दिवसाचा मुख्यमंत्री ते जनतेचा कायमस्वरुपी मुख्यमंत्री अशी कथा नायक सिनेमाची होती. या चित्रपटाशी साधार्म्य असलेली घटना आता घडत आहे.
उत्तराखंडमध्ये ही घटना सत्यात उतरत आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीला उत्तराखंडची एका दिवसाची मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळणार आहे. सृष्टी गोस्वामी अस या विद्यार्थिनीचे नाव असून तिला एक दिवसाची मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळणार आहे.
हरिद्वारच्या बहादूराबाद ब्लॉकच्या दौलतपूरची रहिवासी असलेली सृष्टी गोस्वामी २४ जानेवारी रोजी एक दिवसाची मुख्यमंत्री होणार आहे. येत्या 24 जानेवारी रोजी बालिका दिवस आहे. यानिमित्ताने मुलींच्या सक्षमीकरणासाठी हुशार विद्यार्थीनीला एक दिवसाची मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी सृष्टी गोस्वामींची निवड करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी याला मंजुरी दिली आहे. यात आणखी विशेष म्हणजे ती सनदी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विधानसभेला संबोधितही करणार आहे.
दरम्यान सुरुवातीला सृष्टी राज्यातील विकासकामांची समीक्षा करेल. त्यानंतर 12 विभागाचे अधिकारी त्यांच्या विभागातील योजनांचे पाच-पाच मिनिटांसाठी सादरीकरण करतील. त्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून ते 3 वाजपर्यंत विधानसभा भरणार असून विधानसभेला ती संबोधित करणार आहे.





