हृतिक रोशनने कौतुक करताच अनिल कपूर यांना अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Hrithik Roshan : अभिनेता हृतिक रोशनचा ‘फायटर’ हा चित्रपटात मागील काही दिवसांपासून चर्चेत होता. अखेर हा चित्रपट 25 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात हृतिक रोशनसह दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर यांची देखील भूमिका असणार आहे. फायटरच्या माध्यमातून दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहेत.
मात्र फायटर प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता हृतिक रोशन, अनिल कपूर यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. त्यादरम्यान हृतिकने अनिल कपूर यांचे तोंड भरून कौतुक केले. त्यावेळी अनिल कपूर यांना अश्रु अनावर झाले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये हृतिक, “मी अनिल कपूर यांना लहानपणापासून पाहत मोठा झालो. त्यांच्याकडून बरेच काही शिकलो. फायटरमध्ये त्यांचा एक सीन होता. त्यांनी या सीनमध्ये जबरदस्त अभिनय केला. मी त्यांचा अभिनय पाहून चकित झालो आणि सीन शूट झाल्यानंतर सीन खूप चांगल्या पद्धतीने शूट झाल्याचे सांगितले. अनिल कपूर आजही एखाद्या सीनसाठी जीव ओतून काम करतात. त्यांचा अभिनय पाहून पुन्हा एकदा वाटले की, त्यांचा असिस्टंट व्हावे,” असे म्हणतो. हृतिककडून कौतुक होत असताना अनिल कपूर यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
Hrithik making Anil Kapoor emotional on stage 🤗🥺 pic.twitter.com/KJbyXEzHvI
— HrithikRules.com (@HrithikRules) January 23, 2024
दरम्यान, दीपिका आणि हृतिक यांची मुख्य भूमिका असलेला सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या सगळ्यात चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, फायटर 25 कोटी रुपयांची मजबूत ओपनिंग करण्याची शक्यता आहे. या सिनेमात दीपिका, हृतिक आणि अनिल कपूर यांच्याशिवाय, करण सिंह ग्रोव्हर, सजिंदा शेख आणि अक्षय ओबेरॉयही दिसणार आहेत.





