Maharashtra Politics : अनिल देशमुखांनी घेतली माघार ! शरद पवारांनी शेवटच्या क्षणी बदलला काटोलचा उमेदवार

नागपूर : विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरायला अवघे काही तास शिल्लक असतानाच काटोलच्या जागेवरून एक मोठी अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काटोलमधून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र आता अनिल देशमुख यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे शेवटच्या क्षणी शरद पवारांना काटोलचा उमेदवार बदलावा लागला.
अनिल देशमुख यांच्याऐवजी त्यांचे पूत्र सलील देशमुख काटोलमधून निवडणूक लढणार आहेत, यासाठी सलील देशमुख उद्या अर्ज दाखल करणार आहेत. सलिल देशमुख निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने अखेर अनिल देशमुखांनी माघार घेतली आणि त्यांच्या घराण्यातील वाद संपला. काटोल विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सलिल देशमुख हे अधिकृत उमेदवार असणार आहे.
अनिल देशमुख तुरुंगात असताना सलील देशमुख यांनी मतदार संघ पिंजून काढला. पक्षाची बांधणी केली. यानंतर सलिल देशमुख यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेऊन काटोलमधून उमेदवारीची मागणी केली होती. सध्या याच भागातून सलील देशमुख जिल्हा परिषद सदस्य आहेत. 2019 च्या निवडणुकीत सलील देशमुख वडिलांच्या विरोधात भाजप कडून लढण्यास इच्छुक होते पण एका जेष्ठ नेत्याच्या मध्यस्थीने सलील देशमुख यांनी माघार घेतली होती.
महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही
जागावाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादीला (अजित पवार) यांना सुटणार आहे. या ठिकाणी अद्याप महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे सलील देशमुख यांच्या विरोधात महायुती कोणाला उमेदवारी देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





