Anil Bonde: दुष्काळावरून राजकारण तापलं! अनिल बोंडेंचा सुप्रिया सुळे, शरद पवारांवर हल्लाबोल
Anil Bonde:

Anil Bonde: अमरावती जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी मोझरी गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत राज्य सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच दुष्काळाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली.
सुप्रिया सुळे यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यापूर्वी आपल्या वडिलांच्या कार्यकाळाचा विचार करावा, असा टोला अनिल बोंडे यांनी लगावला.
विदर्भात शेतकरी आत्महत्या होत असताना शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी विदर्भाकडे पुरेसे लक्ष दिले नाही, असा आरोप बोंडे यांनी केला. तसेच गोवारी समाजाच्या आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
दरम्यान, मोझरी परिसरातील शेतीची पाहणी करताना सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोंडे यांनी सांगितले. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी उपाययोजना सुरू केल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले.
शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी बँकांनी त्यांची अडवणूक करू नये, अशी सूचनाही बोंडे यांनी केली. शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते बँकांमध्ये जाऊन मदत करतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.





