“नेवासा पाणीटंचाईवर संताप ! दोन दिवसात पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन”

नेवासा : नेवासा शहरात गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. नागरिकांकडून ३६५ दिवसांची पाणीपट्टी वसूल केली जाते, परंतु पाणीपुरवठा वर्षभरात निम्म्याच दिवस मिळतो. नगरपंचायत प्रशासनाच्या या बेजबाबदारपणावर माजी नगरसेवक राजेंद्र मापारी यांनी संताप व्यक्त केला असून, दोन दिवसांत पाणीपुरवठा नियमित न झाल्यास सर्व प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
नगरपंचायतीत प्रशासकराज लागू झाल्यापासून नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. अनेक प्रभागांत आठवडाभर पाणी मिळत नाही, तर काही ठिकाणी पाणीपट्टी पूर्ण भरूनही महिनाभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनातील हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
यासंदर्भात माजी नगरसेवक राजेंद्र मापारी, संदीप बेहळे आणि स्वप्नील मापारी यांनी नगरपंचायतच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती तळेकर यांना निवेदन सादर केले. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपंचायत कार्यालयात मोठे आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. माजी नगरसेवक संदीप बेहळे यांनीही प्रशासनाला नागरिकांच्या गैरसोयी दूर करण्याचे आवाहन करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.





