लग्न 2 वर्षांचे, मात्र घटस्फोटाला लागले 8 वर्ष… ब्रॅड पिट-अँजेलिना जोली अखेर झाले विभक्त

Brad Pitt & Angelina Jolie Divorce : एकेकाळी हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी असलेल्या अभिनेता ब्रॅड पिट आणि अभिनेत्री अँजेलिना जोली यांनी घटस्फोट घेतला आहे. 8 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर दोघांना वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी 2005 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर 2014 मध्ये लग्न केले. दोघांना 6 मुलं आहेत.
या जोडप्याने वर्ष 2016 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र, काही करारांमुळे कायदेशीर प्रक्रिया लांबत गेली. न्यायालयाने 2019 मध्येच दोघे विभक्त झाल्याचे म्हटले होते. मात्र, घटस्फोटाचा अंतिम निर्णय 2024 मध्ये देण्यात आला.
ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली यांचे प्रकरण हॉलिवूडमधील सर्वाधिक काळ चालणाऱ्या घटस्फोट प्रकरणापैकी एक आहे. या प्रकरणावर बोलताना अँजेलिनाचे वकील जेम्स म्हणाले की, जवळपास 8 वर्षांपूर्वी अँजेलिनाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. ती आणि तिच्या मुलांनी पिटबरोबर शेअर केलेल्या सर्व संपत्ती सोडली असून तिने कुटुंबावर लक्ष केंद्रित केले. अखेर हे प्रकरण संपल्याने आता तिला आराम मिळेल.
अँजेलिनाने घटस्फोटाच्या अर्जात उल्लेख केला होता की, ब्रँड पिटने यूरोप ट्रिपवर असताना विमानामध्ये तिला व तिच्या मुलांना योग्य वागणूक दिली नाही. ब्रँडने त्यावेळी शिव्या दिल्या व मारहाण केली होती. या घटनेनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला. तसेच, दोघांमध्ये घटस्फोट झाला असला तरीही मुलांचे जबाबदारी कोणाची असेल व संपत्तीचा तोडगा काय निघाला, याबाबतची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे.




