अंगणवाडी सेविकांची बीएलओ म्हणून नियुक्ती नको

साईश्रद्धा अंगणवाडी संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
संगमनेर – अंगणवाडी सेविकांचा मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून समावेश करू नये, या मागणीसाठी महाराष्ट्र साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेमार्फत संगमनेर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आज प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना निवेदन दिले.
मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)च्या कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेकडे प्राथमिक शिक्षक संघाने केलेली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सदर मागणीचे पत्र पाठविले होते. त्यावर कार्यवाही करुन प्राथमिक शिक्षकांना वगळून अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कार्यालयातील लिपिकांची नियुक्ती करुन मतदार यादी पुनरिक्षण करण्याचे सूचविले होते. यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधिन राहून संगमनेर व अकोले तालुक्यांतील अंगणवाडी सेविकांनी यास विरोध दर्शविला आहे.
तसेच औरंगाबाद, नाशिक व पुणे विभागातील अंगणवाडी कर्मचारी व सेविकांना गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाहीत. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वाढीव मानधनाचा फरकही अद्यापपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम करण्याची सक्ती करू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे. निवेदनावर अध्यक्षा अनिता वाकचौरे, सचिव प्रमिला निळे, अंगणवाडी सेविका सोनाली पवार, वर्षा वाकचौरे, निशा बटवाल, रूपाली अभंग, सुषमा गाडेकर, एम. एन. कालेकर, संगीता कदम, मंगल नरोडे आदी सेविकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




