Ane Ghat Waterfall: भारतातील सर्वात मोठा ‘नैसर्गिक शिलासेतू’ पाहायचाय? आणे घाटातील ‘या’ ठिकाणी नक्की भेट द्या
Ane Ghat Waterfall: कल्याण-नगर महामार्गावरील २ किलोमीटरच्या नागमोडी घाटात दमदार पाऊस; ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यात चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी.

Ane Ghat Waterfall – कल्याण-नगर महामार्गावर आळेफाट्यापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आणे आणि गुळूंचवाडीच्या दरम्यान असलेल्या दोन किलोमीटरच्या नागमोडी आणे घाटात निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य बहरले आहे. घाटातील रस्त्यालगतच असलेला मनमोहक पाण्याचा धबधबा सध्या प्रवाशांचे आणि पर्यटकांचे मन मोहून घेत असून, या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
यंदाच्या समाधानकारक पावसामुळे घाटातील धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहत आहे. महामार्गावरून ये-जा करणारे प्रवासी व पर्यटक येथे वाहने थांबवून वाहत्या पाण्यात चिंब भिजण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी थांबलेले पर्यटक दरीतील पाऊलवाटेने व पायऱ्यांवरून खाली उतरून या ऐतिहासिक शिलासेतूची भव्यता पाहण्यासाठी आणि मळगंगा देवीचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत.
दरीतील खडकांतून वाहणारे पाण्याचे प्रवाह, आजूबाजूला असलेली गर्द झाडी आणि पाण्याच्या प्रवाहाचा खळखळणारा आवाज पर्यटकांना भुरळ घालत आहे. सभोवतालचे निसर्गरम्य वातावरण आणि थंड हवेमुळे आणे घाट सध्या पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनले आहे.
नैसर्गिक ‘शिलासेतू’ आणि ‘मळगंगा मंदिर’
याच धबधब्याच्या खाली थोड्याच अंतरावर, घनदाट जंगलाच्या सानिध्यात भारतातील सर्वात मोठा प्रसिद्ध ‘नैसर्गिक शिलासेतू’ आहे. या शिलासेतूच्या समोरील दरीत गुळूंचवाडी ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या मळगंगा देवीचे मूळ ठाण मंदिर वसलेले आहे.





