छोटा हत्तीचा अपघात झाला अन् रस्त्यावर पडले नोटांचे बंडल; 7 कोटी रुपये जप्त

हैदराबाद – लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ईडी (ED), सीबीआयच्या धाडीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली जात आहे. निवडणूक काळात पोलिसांच्या नाकाबंदी आणि प्रचार यंत्रणेदरम्यान होत असलेल्या तपासातही रोकड आढळून येत आहे. अनेक ठिकाणी मतदारांना वाटण्यासाठी किंवा इतर कामासाठी वापरण्यात येत असलेली अवैध रोकड जप्त करण्यात आली आहे. आता, आंध्र प्रदेशातही 7 कोटी रुपयांची रोकड पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे.
पूर्व गोदावरी जिल्ह्यात पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये लपवून 7 कोटी रुपये नेण्यात येत होते. टाटा एस या छोटा हत्ती वाहनातून ही रक्कम नेली जात होती. मात्र, एका ट्रॅक्टर ट्रॉलीसोबत छोटा हत्तीची धडक झाली. यात नोटांचे बॉक्स खाली पडले.
छोटा हत्ती वाहनात ठेवण्यात आलेल्या पोत्यांमध्ये काही पुठ्ठयांचे बॉक्स होते, ज्यामध्ये रोकड ठेवण्यात आली होती. मात्र, दोन वाहनांची धडक झाल्यानंतर बॉक्समधील रक्कम रस्त्यावर पडल्याचा पाहताच स्थानिकांनी तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली. विजयवाडा येथून हे वाहन विशाखापट्टणमकडे जात असताना ही अपघाताची घटना घडली. या अपघातात छोटा हत्ती वाहनातील चालक जखमी झाला असून त्यास गोपालपूरम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.





