Adulterated Milk : आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्हा येथे भेसळयुक्त दूध प्रकरणामुळे मोठी दुर्घटना घडली असून, तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लालाचेरुवु, चौदेस्वरनगर आणि स्वरूपनगर या भागांत फेब्रुवारी महिन्यापासून भेसळयुक्त दूध विकले जात होते. हे दूध सेवन केल्यानंतर नागरिकांना मळमळ, उलट्या, पोटदुखी, लघवी बंद होणे आणि मूत्रपिंड निकामी होणे यांसारखे गंभीर त्रास होऊ लागले. 22 फेब्रुवारीपासून या तक्रारी समोर येऊ लागल्या. तपासादरम्यान नरसापूरम येथील एका डेअरीमधूनच हे भेसळयुक्त दूध पुरवले जात असल्याचे उघड झाले. या दुधात ‘एथिलीन ग्लायकॉल’सारखा विषारी रसायन मिसळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात 20 हून अधिक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर डायलिसिस आणि व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. या सर्वांमध्ये लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे. सुमारे 100 हून अधिक कुटुंबांना या डेअरीतून दूध पुरवले जात होते. दूध पिल्यानंतर काही तासांतच नागरिकांची प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. सध्या आयसीयूमध्ये रुग्णांवर उपचार सुरू असून, प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.