Sadabhau Khot: “…अन् मंत्रीपद घेऊन गेले, आपण फक्त बघत बसलोय”; सदाभाऊ खोतांनी व्यक्त केली खंत
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांच्याकडून महायुती सरकारकडे प्रस्थापित नेत्यांच्या चौकशीची मागणी

Sadabhau Khot : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी आयोजित सभेत विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्री पद न मिळाल्याने खदखद व्यक्त केली आहे. तर महायुतीत नव्याने सामील होऊन मंत्रिपदे पदरात पाडून घेणाऱ्या नेत्यांवर खास शैलीत टीका केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक करत राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सदाभाऊ खोत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेला नेता तळागाळातून पुढे येत तब्बल 150 आमदारांचे नेतृत्व करतो. पण,पडळकर साहेब, वाड्यातले प्रस्थापित सरदार देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, त्यांना मिठी मारली आणि मंत्रिपदं पदरात पाडून घेतले. आपण मात्र फक्त बघतच बसलो, आपल्यावर काय वाईट वेळ आली आहे,” असे सांगत त्यांनी महायुतीतील प्रस्थापितांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
“आमच्यासारखा विस्थापित घटकातून आलेला नेता राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि वर्षानुवर्षे सत्तेत असलेले प्रस्थापित त्यांच्यापुढे नतमस्तक होतात, हाच खरा आमचा वैचारिक विजय आहे,” असेही खोत म्हणाले.
प्रस्थापित नेत्यांच्या चौकशीची मागणी
तर सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचारावर बोट ठेवताना सदाभाऊ म्हणाले, “आज प्रत्येक आमदाराला बँकेत संचालक व्हावंसं वाटतंय. कारण त्यांना चांगलं ठाऊक आहे की, ही बँक म्हणजे ‘अलिबाबाची गुहा’ आहे. एकदा का त्या गुहेत शिरलो की रिकामं पोतं घेऊनच बाहेर पडायचं, हे गणित त्यांनी पक्कं ओळखलं आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, या प्रस्थापित नेत्यांना आधी आत घ्या आणि तेल लावून त्यांची चांगली मालिश करा. यांनी जिल्हा बँका, सूतगिरण्या आणि साखर कारखाने कसे गिळंकृत केले, याचा सविस्तर अहवाल तयार करा. या प्रस्थापितांनीच ग्रामीण भागातील गावगाडा उद्ध्वस्त केला आहे.”
इथेनॉल मिश्रित इंधनाचे समर्थन
यावेळी सदाभाऊ खोत यांनी इथेनॉल मिश्रणावर होणाऱ्या आरोपांचे खंडन केले. “इथेनॉलमुळे जर वाहने बंद पडत असती, तर आज मुंबईतील निम्म्याहून अधिक गाड्या रस्त्यावर बंद पडल्या असत्या. परदेशात पेट्रोलमध्ये ३० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळले जाते, आपण तर सध्या २० टक्केच वापरत आहोत. या निर्णयामुळे देशाचे हजारो कोटी रुपयांचे परकीय चलन वाचत असून शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होत आहे,” असेही आमदार सदाभाऊ खोत म्हणाले.
हेही वाचा:






