…अन् पोलिसांनी ‘तिला’ पुन्हा मिळवून दिले घर ! खडकीत आढळलेली तेलंगणातील मुलगी सुखरूप

पुणे -पेट्रोलिंगदरम्यान खडकी पोलिसांनी दाखवलेल्या सजगतेमुळे तेलंगणा राज्यातून अपहरण झालेली 13 वर्षीय मुलगी पालकांना सुखरुप मिळाली. ही मुलगी घाबरलेल्या अवस्थेत खडकी परिसरात फिरत होती. पोलिसांनी अथक प्रयत्न करत तिचा पत्ता शोधून काढला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले, सहायक पोलीस निरीक्षक शारदा वालकोळी आणि कदम हे गस्तीवर असताना क्रिस्टल रॉयल सोसायटी याठिकाणी आले होते. त्यावेळी एक मुलगी रस्त्यावर फिरत असल्याचे स्थानिक नागरिकांनी त्यांना सांगितले. पोलिसांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली. तेव्हा ते येथे कशी आली हे सांगता येत नव्हते. मात्र, बॅग आणि मोबाइल ट्रॅव्हलमध्येच विसरल्याचे सांगत होती. तिला घरच्यांचा फोन नंबर सांगता येत नव्हता. फक्त तिच्या बोलण्यातून तेलंगणा आणि हैद्राबाद एवढेच शब्द येत होते. तिच्याकडून कसा बसा पत्ता मिळवण्यात पोलिसांना यश आले. यानंतर पोलिसांनी तेलंगणा पोलीस नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधून मुलीने सांगितलेल्या पत्यावरुन तिची माहिती मिळवण्यास सांगितले. तेलंगणा पोलिसांनी ही मुलगी नशिराबाद हद्दीतील असल्याचे कळवले. त्यानुसार संपर्क साधून सदर मुलीबाबत चौकशी केली असता त्यांनी अपहरणाची तक्रार दाखल असल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीला संरक्षणासाठी कर्वे रोड येथील एका संस्थेत ठेवण्यात आले. मुलीचा सख्खा भाऊ आणि तेलंगणा पोलीस येताच खडकी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया करत मुलीला सुखरुप त्यांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शारदा वालकोळी, उपनिरीक्षक वैभव मगदुम, उप निरीक्षक संतोष भांडवलकर आदींच्या पथकाने दिली.





