“…अन् सरकार मात्र प्रसिद्धीला हपापले आहे”; काँग्रेसने ‘तो’ शासकीय अध्यादेश शेअर करत साधला शिंदे सरकारवर निशाणा

Congress Satej Patil on Shinde Govt| लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने राष्ट्रीय स्तरावरील 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र महाराष्ट्रातील आघाडी व युतीतील जागा वाटपावर कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
याप्रकरणी चर्चा सत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जाहिरातबाजीवर खर्च केला जाणार आहे. यावरुन काँग्रेसने शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. इतकेच काय तर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी ४ मार्च रोजी राज्य सरकारने काढलेल्या जीआरची प्रतच सोबत जोडत शिंदे सरकारवर टीका केली आहे.
सतेज पाटील ट्वीट Congress Satej Patil on Shinde Govt|
“महाराष्ट्र शासनाने लोकसभेच्या प्रचाराच्या हेतूने एका महिन्याच्या प्रसिद्धीसाठी ‘विशेष माध्यम आराखडा’ मंजूर केला आहे. यामध्ये ३० दिवसांसाठी तब्बल ८४ कोटी रुपये म्हणजेच दिवसाला २ कोटी ८० लाख रुपये माध्यमांतील प्रसिद्धीवर उधळले जाणार आहेत”, अशी पोस्ट सतेज पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने लोकसभेच्या प्रचाराच्या हेतूने एका महिन्याच्या प्रसिद्धीसाठी ‘विशेष माध्यम आराखडा’ मंजूर केला आहे. यामध्ये ३० दिवसांसाठी तब्बल ८४ कोटी रुपये म्हणजेच दिवसाला २ कोटी ८० लाख रुपये माध्यमांतील प्रसिद्धीवर उधळले जाणार आहेत.
या खर्चाची आकडेवारी पुढीप्रमाणे विभागलेली… pic.twitter.com/G2RHXZPmka
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) March 6, 2024
सोबत सतेज पाटील यांनी आकडेवारी देखील सांगितली आहे. “वर्तमानपत्रे – २० कोटी रुपये, वृत्तवाहिन्या – २० कोटी ८० लाख रुपये, डिजिटल होर्डिंग-एलईडी – ३७ कोटी ५५ लाख रुपये, सोशल मीडिया – ५ कोटी रुपये. ऐन आचारसंहितेच्या काळात जनतेच्या पैशाचा वापर पक्षाच्या प्रचारासाठी केला जाणार आहे”, असा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे. Congress Satej Patil on Shinde Govt|
“ही गोष्ट मुक्त अन् निष्पक्ष निवडणुकीसाठी अत्यंत घातक असून निवडणूक आयोगाने यावर आळा घालावा आणि ही प्रसिद्धी मोहीम तात्काळ थांबवावी अशी मी मागणी करतो. एकीकडे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही, आशा सेविका तुटपुंज्या मानधनासाठी संपावर जातायेत, अन् सरकार मात्र प्रसिद्धीला हपापले आहे,” अशी घणाघाती टीका सतेज पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा:
Stock Market| शेअर बाजाराने पुन्हा रचला इतिहास; सेन्सेक्स 74000 पार, तर निफ्टीतही वाढ





