…अन् कावळ्यांच्या ‘सुपाऱ्या’ येऊ लागल्या

पुणे – एकदा कोणाकडे तरी दहाव्याचा विधी होता. काही केल्या पिंडाकडे कावळा फिरकत नव्हता. तेव्हा मी प्रथमच कावळ्याचा आवाज काढला आणि काय आश्चर्य…लगेचच कावळे जमा होऊन पिंडाला कावळा शिवण्याचा प्रश्न निकाली निघाला. सगळ्यांनी माझी पाठ थोपटली आणि मग मी कावळ्यांना बोलावू शकतो, अशी माझी ख्याती पसरली. त्यानंतर मला कावळ्यांना बोलावण्याच्या सुपाऱ्या येऊ लागल्या.
कावळ्याचा आवाज काढल्याने पैसे मिळू शकतात, हे लक्षात आले आणि कावळेच माझ्या अर्थार्जनाचे साधन बनले, ताडोबाचे बर्डमन अशी ओळख असलेल्या सुमेध वाघमारे यांनी ही आठवण सांगताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. निमित्त होते जंगल बेल्स, नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट व बोगनवेल फार्म्स यांनी आयोजित केलेल्या ‘वाइल्ड लाइफ फेस्टिवल फॉर किड्स या कार्यक्रमाचे.
जंगलांचे आणि वन्यप्राणी संवर्धनाचे महत्त्व मुलांना योग्य वेळी कळावे, यासाठी आयोजित या कार्यक्रमात सुमेध वाघमारे यांच्या अनुभव कथनाचे सत्र हे विशेष आकर्षण होते. दोनशेहून अधिक पक्षी आणि प्राण्यांचे हुबेहूब आवाज काढण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुमेध यांनी विविध पशुपक्ष्यांचे आवाज ऐकवून पशुपक्ष्यांच्या वर्तनसवयी, शिकार, खाद्य आणि मानव-निसर्गातील साहचर्याची भूमिका ठसवण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले, मी गावखेड्यातला एक साधा मुलगा होतो. सुरुवातीला शेळ्या- बकऱ्या चरायला न्यायचो. शेळ्या पांगल्या, की त्यांची आई जसा आवाज काढून त्यांना बोलावते, तसे आवाज काढायला मी शिकलो. नंतर कावळे आपसांत ज्या आवाजात संवाद साधतात, तो आवाज मी हुबेहूब काढू लागलो. आश्चर्य म्हणजे माझ्या आवाजाला कावळे लगेच प्रतिसाद देऊ लागले.
कार्यक्रमात डॉ. प्राची मेहता यांनी घुबडांवरील माहितीचे सादरीकरण केले. मृदुला केळकर यांच्या मानव आणि वन्यप्राणी सहअस्तित्वावरील पपेट शो, वनपरीक्षेत्र अधिकारी अर्पित मैराल यांचे व्याघ्र संवर्धनावरील सादरीकरण मुलांना विशेष भावले. द्वैत दिंडोरे निर्मित इंडियन वुल्फज या लघुपटाचे प्रदर्शन झाले. नेचर वाॅकच्या अनुज खरे यांनी परिचय आणि सूत्रसंचालन केले.





