Anbil Mahesh Poyyamozhi : तमिळनाडूचे माजी शिक्षणमंत्री अंबिल महेश पोय्यामोझी यांना अटक
खासगी शाळांना परवाने आणि इतर मान्यता देण्याच्या मोबदल्यात १०० कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तमिळनाडूचे माजी शाळा शिक्षणमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे वरिष्ठ नेते अंबिल महेश पोय्यामोझी (Anbil Mahesh Poyyamozhi) यांना अटक करण्यात आली आहे.

Anbil Mahesh Poyyamozhi : खासगी शाळांना परवाने आणि इतर मान्यता देण्याच्या मोबदल्यात १०० कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तमिळनाडूचे माजी शाळा शिक्षणमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे वरिष्ठ नेते अंबिल महेश पोय्यामोझी (Anbil Mahesh Poyyamozhi) यांना सोमवारी चेन्नई पोलिसांच्या सेंट्रल क्राईम ब्राँचने अटक केली आहे. सरकारी मान्यता मिळवून देण्याचे आश्वासन देऊन खासगी शिक्षण संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचा आरोप माजी मंत्र्यांवर आहे.
या गैरव्यवहारात सुमारे १७७ खासगी शाळांचा समावेश असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. डिजिटल उपकरणांमधून मिळालेला डेटा, कागदपत्रे आणि चौकशीदरम्यान नोंदवलेल्या जबाबांवरून महेश (Anbil Mahesh Poyyamozhi) यांचा भ्रष्टाचार आणि विश्वासघातामध्ये थेट सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे.
या आधारे पोलिसांनी माजी मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. महेश यांनी अटकेपासून संरक्षणासाठी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायमूर्ती व्ही. लक्ष्मीनारायण यांनी त्यांची याचिका फेटाळून लावली, ज्यानंतर लगेचच पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली.
याशिवाय, महेश (Anbil Mahesh Poyyamozhi) यांनी आपल्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यासाठीही न्यायालयात याचिका दाखल केली आहे.दरम्यान, महेश यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर दुसरीकडे, सत्ताधारी तमिळगा वेत्री कझगम सरकार राजकीय वैमनस्यातून विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप द्रमुकने केला आहे.






