nagar | सदृढ पिढी घडविण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे – कुंदन कांकरिया

नगर (प्रतिनिधी) – गरोदर मातांसह नवजात बालकांना उत्तमप्रकारे आरोग्य सुविधा उपलब्ध करुन सदृढ पिढी घडविण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे. भावी पिढीच्या सदृढ आरोग्यासाठी या हॉस्पिटलची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
अतिदक्षता विभाग, सर्व आरोग्य सुविधांनी सज्ज अद्यावत यंत्रणा व तज्ज्ञ डॉक्टर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा घेऊन जात असून, या सेवा कार्यात सहभागी होण्याचा अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन उद्योजक कुंदन कांकरिया यांनी केले.
जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित स्त्रीरोग व बालरोग मोफत तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्मिता कांकरिया, गितांजली कुवाड, श्रेयस कांकरिया, पूजा कांकरिया,
डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, संतोष बोथरा, सुभाष मुनोत, डॉ. आशिष भंडारी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र मुथा, डॉ. सोनल बोरुडे, बालरोग तज्ज्ञ डॉ. श्रेयस सुरपुरे, डॉ. सोनाली कणसे, डॉ. वैभवी वंजारे, पेडिएट्रिक सर्जन डॉ. रुपेश सिकची आदी उपस्थित होते.
संतोष बोथरा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) सर्व सुविधांनी सज्ज करण्यात आला आहे. तर गरोदर मातांची देखील उत्तमप्रकारे काळजी घेतली जात आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठे एनआयसीयू सेंटर या हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित असून, 3 तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव असलेले कर्मचारी सेवा देत आहेत. डॉ. सोनल बोरुडे म्हणाल्या की, प्रसुती पूर्वी व नंतर देखील महिलांना विविध खर्चिक चाचण्या कराव्या लागतात.
हे सर्वसामान्यांना परवडत नाही. मात्र या सर्व खर्चिक आरोग्यसेवा हॉस्पिटलमध्ये अल्पदरात दिल्या जात आहे. डॉ. श्रेयस सुरपुरे म्हणाले, २६ बेडच्या अद्यावत एनआयसीयू विभागात नवजात बाळाच्या श्वासोच्छवासाच्या त्रासावर उपचार, बालदमा ए.आर.डी.एस. (श्वसनदाह), नवजात बालकांच्या कावीळीसाठी फोटोथेरपी व रक्त बदलण्याची सुविधा, अनुवंशिक आजार, जन्मजात आजारांचे निदान व उपचार, बालदमा तसेच लहान मुलांचे टू डी इको, एक्स रे, पॅथोलॉजी लॅब 24 तास उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. रुपेश सिकची म्हणाले, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध शस्त्रक्रिया मोफत केल्या जात असून, जे योजनेत बसत नाही त्यांना अल्पदरात सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात ७० बालकांची तर ८० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दर शनिवारी बालकांची ओपीडीमध्ये आरोग्य तपासणी मोफत असून, सोमवार ते शुक्रवार ५० रुपयात तपासणी केली जात आहे. सूत्रसंचालन करुन आभार डॉ. आशिष भंडारी यांनी मानले.

