एआय या शतकात मानवतेसाठी अलिखित संकेत; पॅरिसमधील एआय शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

पॅरिस : या शतकात आर्टिफिशियल इंटिलिजन्स मानवतेसाठी संकेत लिहीत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एआय हे तंत्र मानवी इतिहासातील अन्य तंत्रज्ञानापेक्षा वेगळे आणि मैलाचा दगड असल्याचे ठाम मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.
एआय हे लक्षणीय उंची गाठत असून अतिशय वेगाने विकसित होते आहे, असे पॅरिस येथे आयोजित कृती परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना ते म्हणाले. या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी आपल्याला निमंत्रित केले, याबद्दल मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे आभार मानले.
कृत्रिम बुद्धिमत्ता यापुर्वीच आपल्या धोरणांना, अर्थकारणाला, सुरक्षेला आणि आपल्या समाजाला देखील नवीन आकार देऊ लागले आहे. एआय या शतकातील मानवतेसाठी नवीन संकेत लिहीत आहे. एआय सर्व सीमा ओलांडून परस्परांवर अवलंबून आहे. एआयच्या माध्यमातून लक्षावधी लोकांच्या आयुष्यात बदल घडववून आणू शकते.
एआयच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, कृषी आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवले जाऊ शकते. स्थायी विकासाचे ध्येय वेगाने आणि सहज गाठता येऊ शकेल, अशा नवीन विश्वाची निर्मिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर केली जाऊ शकते, असेही मोदी म्हणाले.
एआयच्या जोरावर प्रगती करण्यासाठी आपल्याला स्रोत आणि अडथळ्यांना एकत्रितपणे सामोरे जायले पाहिजे. विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढीला लागेल, अशी खुली स्रोत यंत्रणा विकसित केली गेली पाहिजे, असे प्रतिपादनही मोदी यांनी केले.
एआयमुळे रोजगाराच्या संधी कमी होतील, ही भीती अनेकांना वाटते आहे. मात्र तंत्रज्ञानामुळे कधीही काम कधीही नष्ट होत नाही, असे इतिहासातूनच दिसते आहे. केवळ कामाचे स्वरुप बदलते आणि नवीन प्रकारचा रोजगार निर्माण होतो एवढेच आहे.
एआयच्या आधारे भविष्याला सामोरे जाण्यासाठी लोकांना कुशल आणि फेरकुशल करणारी गुंतवणूक व्हायला हवी. तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण आणि नागरिककेंद्रित वापर वाढायला हवा. तसेच चुकीची माहिती, डीपफेक आणि सायबर सुरक्षेशी संबंधित धोके टाळण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.
पक्षपातविरहीत गुणवत्तापुर्ण माहीती तयार केली गेली पाहिजे. परिणामकारक आणि वापरण्यायोग्य तंत्रज्ञानासाठी त्याला पोषक पाया असला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नाविन्याविषयी सर्व जगाने खुलेपणाने विचार करायला हवा. सामूहिक मूल्यांच्या जोपासना, धोके दूर करणे आणि विश्वास वाढीस लागावा या हेतूने वैश्विक प्रशासनासाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. सर्वांना समान संपर्काची संधी असावी, विशेषतः ग्लोबल साऊथला समान संधी मिळावी, अशा वैश्विक प्रशासनाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत आपले अनुभव देऊ इच्छितो…
एआयच्या क्षेत्रात भारताचा अनुभव सर्वांशी समायिक करून घेतला जावा, अशी आपली इच्छा असल्याचेही मोदींनी सांगितले. भारत एआयच्या माध्यमातून अनेक भाषांचे मॉडेल विकसित करत आहे. कॉम्प्युट पॉवर सारख्या क्षेत्रात भारत सार्वजनिक-खासगी भागीदारीचे मॉडेल वापरत आहे. हे मॉडेल संशोधकांना आणि स्टार्टअप उद्योगांना किफायतशीर दरात उपलब्ध करून दिल्याचेही मोदींनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भविष्य हे चांगल्यासाठी आणि सर्वांसाठी असल्याचे सर्वांना पटावे यासाठी भारत आपला अनुभव सर्वांना देऊ इच्छितो, असेही मोदी म्हणाले.





