अनपेक्षित घडामोडीने सर्वांनाच धक्का! मनसेचे उमेदवार ‘मशाल’ चिन्हावर लढणार; कुठे घडली घटना?

खरंतर दोन्ही पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात जागा वाटपांची चर्चा सुरू असतानाच या मोठ्या घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी शेवटचा दिवस होता. या दिवशी अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या काही तास आधी मनसेचे 14 उमेदवारांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करून प्रत्येक पॅनलमध्ये मनसेचा एक उमेदवार आणि ठाकरे गटाचा एक उमेदवार असणार आहे.
इच्छुकांनी अपक्ष म्हणून लढायचे किंवा आपापल्या राजकीय गणितांनुसार निर्णय घ्यायचा, अशी मुभा पक्षाकडून देण्यात आली होती. त्यानंतर अंबरनाथ नगरपरिषमध्ये मोठी आणि सर्वांनाच धक्का देणारी राजकीय घडामोड घडली. अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असे तीन पक्ष एकत्र आले आले आहेत. त्यामुळे नगराध्यपदाकरिता अंजली राऊत यांची उमेदवारी अंतिम करण्यात आली आहे. तर काँग्रेस यामधून बाहेर पडली आहे.
भाजपकडून तेजश्री करंजुले-पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर शिवसेनेकडून माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी डॅा. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. त्यामुळे अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीपूर्वीच घडलेल्या अनपेक्षित घडामोडीमुळे मोठी निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात कोणत्या राजकीय हालचाली होतात ते पाहणे महत्वाचे असणार आहे.





