एक अखंड ऊर्जास्रोत

महाराष्ट्राचे आणि भारताचे राजकारण गेल्या 53 वर्षात शरद पवार या नावाभोवतीच फिरत राहिले आहे. भारतीय राजकारणातील भीष्म पितामह, चाणक्य, कसलेला पैलवान, वस्ताद, बाप माणूस अशा विविध बिरूदावल्यांनी पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांचा गौरव केला जातो, तो विनाकारण नव्हे. कारण साहेबांनी आजपर्यंत नेहमी विधायक आणि विकासाचे राजकारण केले आहे. त्यामध्ये समाजकारणाला प्राधान्य दिले. विनाकारण कधीही विरोधासाठी विरोध केला नाही. दिलेला शब्द नेहमीच पाळला आहे. महाराष्ट्रातील 2019 ची विधानसभा निवडणूक हे त्यांचे ताजे उदाहरण आहे.
शरद पवार यांच्या अथक प्रयत्नातूनच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊ शकले. माझा सामान्य शेतकरी, कामगार, महिला, अगदी तळागळातील माणूस यांच्या हिताला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. मी काय म्हातारा झालोय काय? असे म्हणत ते तरुण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा निर्माण करतात. तेवढ्याच तडफेने, ताकदीने नेतृत्वाचा एक आदर्श घालून देतात. परिणामी भारतीय राजकारणातील या द्रष्ट्या लोकनेतृत्वावर असंख्य कार्यकर्ते, तरुण, अबालवृद्ध आजही जीव ओवाळून टाकतात.
भारतीय राजकारणाच्या पटलावर अनेक प्रभावी लोकनेतृत्व उदयास आली, काही लोकनेते उगवले आणि आज त्यांचे अस्तित्व पूर्णतः संपलेले आहे. पण पाच दशकांहून अधिक काळ पद्मविभूषण शरदचंद्रजी पवारसाहेब आजही एखाद्या धीरोदात्त महानायकाप्रमाणे सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. त्याचीच चुणूक महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आली.
राजकारणात केवळ सत्ताकारणालाच महत्त्व न देता या महानायकाने समाजकारण आणि विकासकारणालाही गतिमान केले. नेहमीच आपला स्वाभिमान जपला, ईडीला आणि मुजोर सत्ताधाऱ्यांनाही थेट आव्हान देऊन त्यांनी कार्यकर्त्यांना पराभूत मानसिकतेमधून बाहेर काढले. त्यांच्या सत्याग्रहापुढे बेदरकार सरकारही झुकले.
निवडणुका येतील वा जातील, कोणी त्या जिंकतील कोणी त्या हरतील, पण या पाच दशकांमध्ये भारताच्या विधायक राजकारणातील एक धीरोदात्त अविचल महानायक म्हणून आदरणीय पवारसाहेबांचे स्थान अढळच राहणार आहे. या महानायकाने प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढायचे कसे हे अवघ्या जगाला दाखवून दिले. राजकारणातील शिष्टाचार, नम्रता, विनयशीलता, सकारात्मकता या महानायकाने नेहमीच जपली आहे. अहंकारापासून ते कोसो मैल दूर आहेत.
आजच्या या सोशल मीडियामध्ये तरुण वर्गाला साहेबांचे विचार पटत असल्याने त्यांच्याकडून साहेबांच्या विचारांना अधिक फॉलो केले जात आहे हे विशेष महत्त्वाचे आहे. कारण तरुणवर्ग हा नेहमी धीरोदात्त व द्रष्ट्या महानायकाच्या शोधामध्ये असतो. त्याचा आदर्श समोर ठेवून पुढे जात असतो. संघर्ष आणि अथक प्रयत्नांतून त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्र राज्यात सत्तास्थानी आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
मा. उद्धव ठाकरे यासारख्या शांत, संयमी परंतु विधायक राजकारणाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वास राज्याचे मुख्यमंत्री करून संपूर्ण देशापुढे मैत्रीचा व विश्वासाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाविकास आघाडी सरकारने आज दमदारपणे व आश्वासक पद्धतीने सत्तास्थापनेची व गतिमान विकासाची वर्षपूर्ती साजरी केली. 15 दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल असे भाकीत करणाऱ्या अनेक राजकीय पंडित व नेत्यांचे पितळ या राजकारणातील वस्तादाने उघडे केले. त्याच्यामागे एक ठाक निर्धार व निश्चयी बाणा होता. करोना काळात संपूर्ण जग थांबलेले असताना साहेब फ्रंटफूटवर येत महाराष्ट्र व देशाला या महामारीतून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.
करोना काळात परदेशामध्ये अडकलेले भारतीय नागरिक, कामगार, व्यावसायिक यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे कार्य साहेबांनी केले. साहेबांच्या या कार्यातून व अथक परिश्रमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, आरोग्यमंत्री मा. राजेशजी टोपे व त्यांचे सर्व सहकारी, प्रशासनातील अधिकारी वर्ग व करोना योद्धे यांना प्रोत्साहन मिळाले. त्यांच्याच प्रयत्नातून संपूर्ण जगाला संजिवनी ठरणारी करोनाची लस त्यांचेच मित्र सायरस पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून बनविण्यात आली आहे.
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनादेखील त्याची दखल घ्यावी लागली. जगातील भल्याभल्या मंडळींनी साहेबांच्या या कार्यास सलाम केला आहे. आजही ते शेतकरी, कामगार, कष्टकरी मंडळींचे प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण देश पिंजून काढीत आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच महाविकास आघाडी सरकारने पदवीधर व शिक्षक मतदारसंघात घवघवीत यश मिळवीत त्यांना एकप्रकारे अनोखी भेट दिली आहे. पुढील बदलाची ही नांदी आहे.
12 डिसेंबर 1940 रोजी बारामतीच्या काटेवाडीत साहेबांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या साहेबांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्याकडून मिळाले. शारदाबाई पवार स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात कार्यरत होत्या. त्या पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्या होत्या. ब्रिटिश राजवटीच्या काळात घराबाहेर पडून समाजासाठी झटणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. वडील गोविंदराव पवार हेदेखील सहकारी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांचे बंधू वसंतराव पवार शेतकरी कामगार पक्षात होते.
साहेबांचा राजकीय प्रवास प्रत्येकालाच थक्क करणारा आहे. 27 व्या वर्षी आमदार, 32 व्या वर्षी राज्यमंत्री, 34 व्या वर्षी कॅबिनेट मंत्री, 38 व्या वर्षी मुख्यमंत्री, 51 व्या वर्षी संरक्षणमंत्री, 64 व्या वर्षी कृषिमंत्री असा 53 वर्षाहून अधिक संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. आजपर्यंतचा सर्वांत तरुण मुख्यमंत्री म्हणून पवारसाहेबांचे नाव आजही कायम आहे.
आयुष्यातली 50 वर्षे पवारसाहेबांनी देशवासीयांच्या मूलभूत विकासासाठी खर्ची घातली. आज कृषी, औद्योगिक, शिक्षण, वैद्यकीय, क्रीडा, सांस्कृतिक, महिला, कामगार, संरक्षण क्षेत्रात जे आमूलाग्र बदल झालेले आहेत. प्रत्येक क्षेत्रात अत्याधुनिक क्रांती झाली आहे. त्याचा पाया पवारसाहेबांनी रचला आहे. दूरदृष्टीने काळाची पावले ओळखून साहेबांनी त्यावेळी घेतलेले निर्णय, आखलेली धोरणे यामुळे आज देश इतर प्रगतीशील देशांच्या स्पर्धेत आघाडीवर आहे.
संरक्षणमंत्री असताना त्यांनी पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही संरक्षण खात्यात काम करण्याची संधी दिली. त्यावेळचा हा त्यांचा निर्णय ऐतिहासिकच ठरला. आज संरक्षण खात्यात देशसेवा करण्यासाठी अनेक विरांगना तयार होत आहे. सलग दहा वर्षे त्यांनी केंद्रात कृषिखाते सांभाळले.
साहेबांनी सत्तेत असताना घेतलेले निर्णय कित्येक पिढ्यांच्या विकासाचा मूलाधार आहे. मुंबईतील दंगली, किल्लारी भूकंप, गुजरातमधील भूजचा भूकंप, तसेच अतिवृष्टी, दुष्काळ या संकटांनंतर सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी हाताळलेली परिस्थिती देश विसरू शकणार नाही. माजी सैनिकांच्या निवृत्तिवेतनात वाढ, वडिलांच्या मिळकतीत मुलींचा हक्क, फळबाग विकास योजना, पोलिसांच्या गणवेशातील बदल, महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचा साधलेला विकास, साखर कारखाने क्षेत्रातील योगदान, महिला आरक्षण विषयातील भूमिका, महिला बचत गटांना बळ देण्याचे धोरण, राज्यातील वंचित घटकांसाठीचे धोरण या सर्वांसाठी साहेबांनी घेतलेले निर्णय आज दूरगामी फलिताला आले आहे. आज विविध क्षेत्रांचा झालेला ठोस विकास हा साठ वर्षापूर्वी साहेबांनी घेतलेल्या निर्णयांमुळे झाला ही बाब साऱ्या भारतीयांना माहिती आहे.
ग्रामीण भागातील तळागाळातील घटकांना, आदिवासी मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण आम्ही देत आहोत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर्वसामान्यांच्या विकासासाठी तळमळीने झटणाऱ्या आधारवडाला सुदृढ आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रत्येक घटकाकडून साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभीष्टचिंतन…






