अकोले (प्रतिनिधी) – भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाने धरणात पाण्याची आवक वेगाने वाढत आहे. भंडारदरा धरण 84 टक्के भरल्याने धरणातून सकाळी 2336 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. पर्यटकांना मोहीत करणारा निसर्गरम्य अॅम्ब्रेला फॉल सुरू झाला आहे
मंगळवारी भंडारदरा धरणाचा पाणीसाठी 9247 दलघफू (83.77% ) झाल्याने तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जलाशय परिचलन सूची नुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याकरीता आज सकाळी 8 वाजता भंडारदरा धरणातून विद्यृत गृहामधून 832, व्हॅाल्वद्वारे (अॅम्ब्रेला फॉल) 286 व सांडव्यामधून 1218 क्युसेक्स असा एकूण 2336 क्युसेक्स विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे. पाण्याची आवक वाढल्यास अथवा कमी झाल्यास विसर्ग कमी-जास्त होऊ शकतो, अशी माहिती भंडारदरा शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धबधबे ओसंडून वाहत आहे. परिसर निसर्गाने नटला आहे. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरण दोन ते तीन दिवसांत ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असल्याने जलाशय परिचलन सूची नुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याकरीता धरणातून आज पाणी सोडण्यात आले. धरण 90 टक्केच्या जवळपास भरल्याने निसर्गरम्य अश्या अॅम्ब्रेला फॉल मधून पाणी सोडण्यात आले आहे.
निसर्गाने नटलेला हा अॅम्ब्रेला फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी आता वाढणार आहे. तसेच पावसाचा, धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक भंडारदरा परिसरात मोठ्या प्रमाणात येत आहे.निसर्गाचा हा आनंद घेताना पर्यटकांनी काळजी घ्यावी. जीवघेणे स्टंट, मोबाईल छायाचित्रण करताना परिसर ओलसर, शेवाळलेला असल्याने पाय घसरून अपघात होण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन वन्यजीव विभाग, जलसंपदा विभाग व पोलीस प्रशासनाचे वतीने करून कडेकोट नियोजन केले आहे.
भंडारदरा धरणात 9247 द.ल.घ.फु.(83.77%) तर निळवंडे 6533 द.ल.घ.फु.(78.45%) एवढा पाणीसाठा झाला. भंडारदरा धरणातून 2336 क्युसेकने तर निळवंडे धरणातून 800 क्युसेकने पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आले आहे.काल भंडारदरा 127, रतनवाडी 172, घाटघर 165, वाकी 103 मि.मी एवढा पाऊस झाला आहे.