nagar | प्रवाशांनी भरलेली एसटी बस पलटली

पाथर्डी, (प्रतिनिधी)- पाथर्डी आगारातील एसटी बस पलटी होऊन बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये एसटी वाहक ,चालक व एक महिला प्रवाशी जखमी झाली आहे. तालुक्यातील भिलवडे-तिनखडी रस्त्यावर भिलवडे येथून प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस (एमएच १४ बी टी ०७१३) रस्त्याच्या बाजूला एका बाजूने उलटली.
पाथर्डी ते पिंपळनेर सकाळची साडेआठ वाजताची नेहमीची गाडी पाथर्डीहून सुटते. मोहटा, करोडी, भिलवडे, तिनखडी, टाकळीमानर मार्गे पिंपळनेरला ही एसटी बस जाते.
शुक्रवारी सकाळी नेहमीच्या वेळेवर पाथर्डीतून निघालेली बस सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास भिलवडे गावातून प्रवासी सोडून व काही प्रवासी घेऊन तिनखडीकडे जात असताना अरुंद रस्त्यावर ही बस एका बाजूने पलटी झाली. या बसमध्ये सुमारे पस्तीस ते चाळीस प्रवासी प्रवास करत होते.
अपघातानंतर बसमधील सर्व प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. या भागात गुरुवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्याच्या बाजूची साईटपट्टी ही चिखलमय बनली गेली होती.
त्यानंतर या साईट पट्टीवरून बस घसरून पलटी झाल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. सुरेश बडे, अमोल बडे, सुभाष बडे व स्थानिक तरुणांनी मदत कार्य केले.दरम्यान पाथर्डी आगारातील बहुतांश गाड्या कालबाह्य झाल्याअसून तांत्रिक काही अडचणीमुळे ही या बस अपघाताला कारणीभूत ठरत आहे.

