नगर। कर्जत-जामखेडमध्ये रंगणार ‘भूमिपुत्र विरूद्ध बाहेरचा लढत

जामखेड – राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात होणार्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यंदा या मतदारसंघात विकासाचा मुद्दे सोडून भूमिपुत्र विरुद्ध पार्सल (बाहेरचा उमेदवार) यावर मुद्दयावरच लढत होणार आहे. तिथं मैदान तेच, उमेदवारही तेच सामाना होणार असून यावेळी कोण बाजी मारणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
आमदार रोहित पवार आणि आमदार प्रा. राम शिंदे हे गेल्या 5 वर्षांपासून विकासाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. कुसडगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभाच्या कार्यक्रमावरूनही मोठा कलगीतुरा रंगला होता. कर्जत जामखेडच्यामधून जाणारा राज्य महामार्ग असलेल्या नगर-सोलापूर या महामार्गावरून अनेक वेळा कामाचे श्रेय कोणी घ्यायचे यासाठी पवार आणि शिंदे यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली होती.भाजपचे सरकार आल्यापासून कर्जत-जामखेड तालुक्याला मोठा निधी मिळाला आहे आणि 2019 आधी आमदार असताना आणि मंत्री असताना मोठ्या प्रमाणात कर्जत-जामखेड तालुक्यात निधी आल्यामुळेच कर्जत जामखेड तालुक्याच्या विकासाचे स्वप्न आता मतदारसंघातील लोक पाहू लागले आहेत आणि त्या निधीवरच मोठा विकास झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जत जामखेडची जनता मला निवडून देतील आणि परकीय अतिक्रमण आपल्याला चालणार नाही. खर्या अर्थाने भूमिपुत्राची गरज आहे असे राम शिंदे म्हणतात.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार रोहित पवार हे देखील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सध्यातरी त्यांच्या पक्षाकडून कोणी इच्छुक नसले तरी काँग्रेसची भूमिका काय राहणार याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. कारण या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला. पक्षाच्या पदाधिकार्यांनी ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी केली आहे. मात्र काँग्रेसकडून उमेदवार कोण राहील, याबाबत अद्यापही कोणाचे नाव समोर आले नाही. मध्यंतरीच्या काळात आमदार रोहित पवार यांच्या काही समर्थकांनी नारजी व्यक्त करीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कुठेतरी आमदार रोहित पवार यांना एक मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामं केल्याचा दावा त्यांनी केला. अनेक योजना कर्जत जामखेड मतदारसंघात आणल्या आहेत. रस्ते, पाणीप्रश्न आणि मुख्यता म्हणजे एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत 5 वर्षे पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावला होता. मात्र सरकार आणि येथील स्थानिक नेत्यांनी मला श्रेय मिळू नये, म्हणून खोटे आरोप करत एमआयडीसीचा प्रकल्प दुसरीकडे वळला असला तरी कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिकांना सर्व गोष्ट माहित आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात भेटी देऊन विकास कामे केली आहेत. त्यामुळे यावर्षीची निवडणूक आपण लढून जिंकून येणार असल्याचा विश्वास आमदार रोहित पवार यांना आहे.
दुष्काळग्रस्त आणि बेरोजगारीच्या प्रश्नाने वेढलेला मतदारसंघ कर्जत-जामखेडमधील बहुसंख्या शेतकरी कोरडवाहू शेती करतात. मतदारसंघात उद्योगधंदे नाहीत. एमआयडीसी आणण्यावरून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मविआचे सरकार गेल्यानंतर प्रत्येक अधिवेशनात रोहित पवार या मुद्द्यावरून आंदोलन करताना दिसतात. या मतदारसंघात जातीची समीकरणेही महत्त्वाची आहेत. इतर मागासवर्गीय समाजाची संख्या मोठी आहे. मराठा कार्ड आणि माधव (माळी, धनगर, वंजारी) ही राजकीय बांधणी निकालावर प्रभाव टाकते. राम शिंदे हे धनगर समाजाचे असल्याने धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा इथे महत्त्वाचा ठरतो.बारामतीप्रमाणेच कर्जत-जामखेडमध्येही पवार विरुद्ध पवार संघर्ष उद्भवलेला असताना भाजपाचे आमदार, माजी मंत्री राम शिंदे हेदेखील पुन्हा एकदा कर्जत-जामखेडमधून विधानसभेवर जाण्यास इच्छुक आहेत . विधानपरिषदेची आमदारकी मिळाली असली तरी राम शिंदे हे कर्जत-जामखेड लढविण्यासाठी इच्छुक आहेत. 2009 आणि 2014 साली त्यांनी येथून विजय मिळविला होता. तसेच 2014 साली सत्ता आल्यानंतर त्यांना मंत्रीपदही मिळाले होते. मात्र 2019 साली पराभव झाल्यामुळे त्यांची विजयाची हॅटट्रीक चुकली. बाहेरच्या आणि तेही नवख्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागल्याची बोच शिंदे यांच्या मनात कायम आहे.
या मतदारसंघात सध्या तरी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. एकेकाळी दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध असणारा आणि सध्या एक नव्हे तर दोन आमदार असणारा आणि आता प्रगतीच्या दिशेने धावणारा कर्जत जामखेड मतदारसंघात थंडीत वातावरण चांगलेच तापणार आहे. कर्जत जामखेड विधानसभेत मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस असणार आहे. भूमिपुत्र आणि बाहेरचा या आरोप प्रत्यारोपाने जामखेड कर्जत मतदारसंघात वातावरण तापले आहे. विद्यमान आमदार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तर विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू आमदारांपैकी एक आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघ हा राज्याच्या लक्ष वेधून घेणारा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात 3 लाख 47 हजार मतदार संख्या आहे.
रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू असल्यामुळे या मतदारसंघावर शरद पवार लक्ष ठेवून असणार आहेत. मागील निवडणुकीतही शरद पवार यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या. त्यामुळे नवख्या असलेल्या रोहित पवार यांना विजय मिळवता आला असला तरी मात्र पाच वर्षात अनेक गणित बदलले आहेत आणि काही दिवसांपासून भाजपचे आमदार राम शिंदे हे सक्रिय झाल्यामुळे ही लढत मोठ्या चुरशीची होण्याची शक्यता आहे. सध्या कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले जात असताना राम शिंदे यांनीही मागे न राहता त्यांनीही विविध सांस्कृतिक आणि महिलांचे कार्यक्रम आयोजित करून निवडणुकीच्या प्रचारास जोरात सुरुवात केली आहे. दोन्ही उमेदवारांना एक जोखमीची बाजू म्हणजे विशेषतः जामखेड तालुका हा बीड जिल्ह्याच्या सीमेवर असल्यामुळे या ठिकाणी जरांगे फॅक्टरचाही मोठा परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे आमदार राम शिंदे यांच्यासमोर हे मोठे आव्हान असू शकते.
वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी मागील वर्षी उमेदवार दिला होता. मात्र वंचित बहुजन आघाडीची जादू चालली नसली तरी तिसर्या आघाडीकडून कोण उभे राहील याकडेही या मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. कर्जत जामखेड मतदार संघातील रस्ते पूर्वीपेक्षाही चांगले झाले असून आता बर्यापैकी पाण्याचा प्रश्न सुटत आला आहे. त्यामुळे फक्त आता बेरोजगारी कमी करण्यासाठी एमआयडीसीचा प्रश्न जो सोडवेल त्या नेत्यामागे कर्जत जामखेड मधील मतदार राहू शकतो. त्यामुळे आता या एमआयडीसीच्या मुद्द्यावर आणि आपला तो आपलाच या मुद्द्यावर ही निवडणूक मोठी गाजणार आहे.




