प्रभात वृत्तसेवा आळंदी ( ज्ञानेश्वर फड ) – नारा विठा गोंदा महादा पाठविला । झाडविली जागा समाधीची ॥ हरिदिनीं जागर केला निशीदिनीं । उदईक पारणीं द्वादशींची ॥ गंगा गिरजा राही रुक्माबाई भामा । उठिल्या रांधण्या पारण्याच्या ॥ नाना प्रकारचे पाक ते अपार । मुनि ऋषीश्वर बोलाविले ॥ वैष्णव देव आणि आले सुरगण । करोनियां स्नान इंद्रायणी ॥ पिंपळाचे पारीं बैसविल्या पंक्ती । पात्रें ते श्रीपती वाढूं लागे ॥ नामा म्हणे देवा करणें साहित्यासी । येतो कासाविसी प्राण माझा ॥ टाळ, वीणा आणि मृदंगाच्या निनादासह माउली.. माउली… श्रीविठ्ठल.. श्रीविठ्ठल… ज्ञानोबाऽऽमाउलीऽ तुकारामच्या जयघोषात वारकऱ्यांच्या उपस्थितीत कार्तिक वद्य द्वादशीनिमित्त माऊलींचा भव्य रथोत्सव पार पडला. रथोत्सव गोपाळपुरातून नगरप्रदक्षिणा मार्गे श्रींच्या मंदिरासमोर आला. रथोत्सवात हजारो भाविकांनी जयघोष केला. यावेळी क्षेत्रउपाध्ये दत्तात्रय केसरी, राजाभाऊ चौधरी, रामभाऊ चोपदार, देवस्थानचे सर्व विश्वस्त आळंदीकरांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याच्या दुतर्फा श्रींच्या दर्शनास ग्रामस्थांनी, भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रस्त्याने सुरेख रांगोळी काढण्यात आली होती. ठीक ठिकाणी माऊलींच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. आळंदी देवाची पोलीस ठाण्यासह, महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र छावा संघाचे अध्यक्ष गणेश मोटकर यांच्या सुमारे ५० पोलीस मित्रांनी तसेच स्वकाम मंडळ व इतर सामाजिक संस्थांनी अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता. श्रीसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. माउलींचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा सोमवारी होणार आहे. तत्पूर्वी द्वादशीला रविवारी पहाटे खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे, आळंदी नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांच्या हस्ते पंचोपचार पूजा झाली. नांदेडकर दिंडी क्र.१५ यांच्यातर्फे मुंक्ताई मंडपात काकडा भजन, श्रींच्या चल पादुकांवर महापूजा, वीणा मंडपात माधव महाराज बडवे यांच्यातर्फे कीर्तन, रात्री केंदूरकर महाराज यांच्यातर्फे कीर्तन, पास धारकांना खिरापत पूजा, प्रसाद वाटप, फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आला. रथोत्सवप्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, श्रींचे पुजारी, श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, अॅड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील,अॅड रोहिणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांसह मानकरी, वारकरी भाविक, आळंदीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी माउली माउली’चा गजर करत रथोत्सव सुरू झाला. ग्रामप्रदक्षिणा चाकण चौक, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर, विठ्ठल रुख्मिणी चौक, जुना नगरपरिषद चौक, माउली मंदिर या मार्गावरून हरिनाम गजरात प्रदक्षिणा झाली. मंदिरासमोरील महाद्वारात आल्यावर रथोत्सवाची सांगता झाली. मंदिरात प्रदक्षिणा, धुपारती झाली. रथोत्सवापूर्वी आळंदीकर ग्रामस्थांनी श्रींची पालखी खांद्यावर घेत गोपाळपूरपर्यंत हरिनाम गजरात आणली.