नवी दिल्ली: आयएनक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयच्या अटकेपासून संरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असला तरी ईडीच्या अटकेपासून त्यांना उद्यापर्यंत (27 ऑगस्ट) संरक्षण दिले आहे. दरम्यान, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चिदंबरम यांच्या कोठडीत चार दिवसांनी वाढ केली आहे.
आयएनएक्स मीडिया प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीबीआयने तर आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात स्वतंत्र एफआयआर दाखल केले आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी चिदंबरम यांनी सुरुवातीला दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती, ही याचिका फेटाळल्यानंतर चिदंबरम यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्यापूर्वीच त्यांना सीबीआयने अटक केल्याने त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणीस सोमवारी सुप्रीम कोर्टाने नकार दिला.