सोरेन यांच्या जामीन अर्जावर उद्या होणार महत्वपूर्ण सुनावणी

नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर करण्याच्या आदेशाला ईडीने आव्हान दिले आहे. त्यावरील महत्वपूर्ण सुनावणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने सोरेन यांना ३१ जानेवारीला अटक केली. त्यानंतर २८ जूनला झारखंड उच्च न्यायालयाने सोरेन यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे सुमारे ५ महिन्यांनी ते तुरूंगाबाहेर आले.
मात्र, सोरेन यांना जामीन मंजूर करण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका ईडीने दाखल केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर काही क्षणांतच त्यांना अटक करण्यात आली.
उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर तुरूंगाबाहेर आलेल्या सोरेन यांनी ४ जुलैला पुन्हा मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सोरेन यांचे भवितव्य अवलंबून असल्याचे मानले जाते. ते झामुमो, कॉंग्रेस आणि राजद यांचा समावेश असणाऱ्या आघाडी सरकारचे नेतृत्व करत आहेत.





