Devoleena Bhattacharjee: “एका प्रामाणिक अधिकाऱ्याने महाराष्ट्र दणाणून सोडलं”… तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं देवोलीना भट्टाचार्जीने केलं कौतुक
Devoleena Bhattacharjee ‘साथ निभाना साथिया’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या देवोलीना भट्टाचार्जीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तुकाराम मुंढे यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले आहे.

Devoleena Bhattacharjee: अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांच्या ठिकाणी स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतर FDA कडून कारवाई केली जात आहे. या कारवाईचे अनेकांकडून स्वागत होत असतानाच आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीनेही तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
‘साथ निभाना साथिया’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या देवोलीना भट्टाचार्जीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तुकाराम मुंढे यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले आहे. तसेच अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या कामासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.
देवोलीनाने काय म्हटलं?
देवोलीनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, एका प्रामाणिक अधिकाऱ्याने संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कामामुळे लक्ष वेधून घेतले आहे आणि जनता त्यांच्या कामाचे कौतुक करत आहे. प्रत्येक विभागात तुकाराम मुंढे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी असतील, तर कायदा मोडण्यापूर्वी अनेकजण विचार करतील, असेही तिने म्हटले.
आपल्या पोस्टमध्ये देवोलीनाने अन्नाच्या गुणवत्तेबाबतच्या नियमांचा उल्लेख करत, “अन्नात तीन झुरळं सापडणं हे परवाना रद्द करण्यासाठी पुरेसं कारण नाही,” असा मुद्दा मांडला. मात्र हा उल्लेख करताना तिने न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेचाही संदर्भ दिला आहे.
देवोलीनाने पुढे तुकाराम मुंढे यांच्या वारंवार झालेल्या बदल्यांचाही उल्लेख केला. प्रामाणिकपणाची अनेकदा मोठी किंमत मोजावी लागते, असे मत तिने व्यक्त केले. तसेच FDA विभागातील कामकाजात सुधारणा करण्यासाठी तुकाराम मुंढे यांना पुरेसा वेळ मिळावा, अशी आशाही तिने व्यक्त केली.
Imagine…one honest officer has shaken the entire Maharashtra, and the public is applauding his work. If every department had officers like him, criminals would think a hundred times before breaking the law.
Sadly, as per the judiciary, even finding three cockroaches in food… https://t.co/D0HQOjMTgC
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) August 13, 2026
तुकाराम मुंढेंच्या कारवाईची चर्चा
तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि प्रशासकीय कामाच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. मे २०२६ मध्ये त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि नियमांचे पालन याबाबत विविध ठिकाणी तपासण्या आणि कारवाया सुरू केल्या.
नामांकित हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या आउटलेट्सवरही तपासणी करण्यात आल्याने अन्नाच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. काही ठिकाणी अस्वच्छता किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली.
या कारवायांमुळे सोशल मीडियावरही तुकाराम मुंढे यांच्या कामाची चर्चा होत आहे. काही नागरिकांकडून त्यांच्या कारवाईचे व्हिडीओ शेअर केले जात आहेत. अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही अनेकांकडून केली जात आहे.
२१ वर्षांच्या कारकिर्दीत २५ बदल्या
तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील बदल्यांची संख्याही अनेकदा चर्चेत आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, त्यांच्या सुमारे २१ वर्षांच्या कारकिर्दीत एकूण २५ वेळा बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे आणि कठोर निर्णयांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
दरम्यान, देवोलीना भट्टाचार्जीच्या या पोस्टनंतर तुकाराम मुंढे यांच्या कामाची आणि FDA च्या कारवाईची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेचा प्रश्न थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने प्रशासनाच्या अशा कारवायांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





